Nilesh Lanke: दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्ता आणि रेल्वे रोखू; निलेश लंकेंचा सरकारला थेट इशारा, कारण…

Nilesh Lanke Issues Strong Warning to Sugar Mill Owners: ऊसदराच्या मागणीवरून निलेश लंकेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रस्ते आणि रेल्वे रोखणार असल्याचा इशारा दिला आहे.

Nilesh Lanke: दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्ता आणि रेल्वे रोखू; निलेश लंकेंचा सरकारला थेट इशारा, कारण...
Nilesh Lanke Warns of Massive Farmers’ Protest if Sugarcane Issues Remain Unresolved
| Updated on: Nov 23, 2026 | 6:26 PM

ऊसदराच्या प्रश्नावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या दोन दिवसांत ऊसदराचा प्रश्न मार्गी न लागल्यास जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करण्यासह रेल्वे वाहतूकही रोखण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, तर शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही निलेश लंके यांनी दिला.

अहिल्यानगरमध्ये ऊसदराच्या प्रश्नावर स्थानिक शेतकरी नेते आणि जिल्हाधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे. या बैठकीला खासदार निलेश लंके आणि शेतकरी नेते रविंद्र मोरे उपस्थित होते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाला दिलेला दर आणि शेतकऱ्यांची अपेक्षित पहिली उचल यावर या बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यातील कारखान्यांकडून सध्या उसाला 3100 ते 3200 रुपये दर दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांची पहिली उचल चार हजार रुपये मिळावी, अशी मागणी आहे.

Loading...

या चर्चेत कारखानदारांना सहभागी करून घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. कारखान्यांचे चेअरमनच बैठकीला उपस्थित नसतील, तर ऊसदर निश्चित कसा होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. त्यानंतर २६ तारखेला जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या चेअरमननी उपस्थित राहावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

ते म्हणाले की, परवा सगळ्या कारखानदारांची बैठक होणार आहे. लेखी स्वरुपात पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतलं आहे. तोपर्यंत उसतोड बंद राहणार आहे. चेअरमनने प्रतिनिधी न पाठवता स्वत बैठकीला यायचं आहे. योग्य निर्णय न झाल्या रेल रोको करणार आहोत. जिल्ह्यातील सगळे महामार्ग बंद पाडणार, असं निलेश लंके म्हणाले आहेत.

दोन दिवसांत ऊसदराचा प्रश्न सुटला नाही, तर सर्व रस्ते बंद करण्याबरोबरच रेल्वे वाहतूकही रोखण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिथे राजू शेट्टी उपस्थित असतात, तिथे निर्णय घेतल्याशिवाय ते उठत नाहीत, असे सांगत लंके यांनी शेतकऱ्यांच्या मागणीवर ठाम भूमिका मांडली. आता 26 तारखेच्या बैठकीत कारखानदार काय भूमिका घेतात आणि ऊसदराचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांत तोडगा निघतो की आंदोलनाची ठिणगी पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us