Sujat Ambedkar : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सुजात आंबेडकर उतरले; विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

वर्ध्यातील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं सांगितलं.

Sujat Ambedkar : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सुजात आंबेडकर उतरले; विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप, दिला मोठा इशारा
Sujat Ambedkar Wardha
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 10:32 PM

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर आणि आरएसएसच्या धोरणांवर हल्लाबोल केला. विद्यापीठातील परिस्थितीवर बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “कुलगुरू किंवा रजिस्ट्रार इथे येऊन चर्चा करायला तयार असते, तर आम्ही त्यांच्याशी नक्कीच चर्चा केली असती. मात्र, त्यांनी चर्चेसाठी चक्क पोस्टमनला पाठवले. प्रशासनाची ही भूमिका अत्यंत बेजबाबदार असून, आता आम्ही थेट रजिस्ट्रारच्या घराला घेराव घालणार आहोत,” असा इशारा त्यांनी दिला.

विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायावर बोट ठेवताना त्यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेतली जात नाही, त्यांना पुन्हा प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.”

आरएसएस आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत ते म्हणाले की, “हा सरळ सरळ संघाचा शिक्षण विकून खायचा प्रयोग आहे. या देशातील दलित, ओबीसी आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी पुढे येऊच नये, तसेच ब्राह्मणांचे वर्चस्व आणि जातिवाद या देशात कायम राहावा, हीच आरएसएसची मानसिकता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला याविरुद्धच ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा सोपा नारा दिला होता.”

सुजात पुढे म्हणाले की, “आताचे कुलगुरू, प्रॉक्टर आणि रजिस्ट्रारसारखे जे पिट्टे आरएसएसने बसवून ठेवले आहेत, त्यांनी हेच ठरवले आहे की कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांच्या पातळीवर दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त टॉर्चर करायचे, त्रास द्यायचा, त्यांना निलंबित करायचे आणि त्यांचे शिक्षण रद्द करून टाकायचे. आरएसएसच्या शाखा भरवणे, प्रोफेसर पाळणे आणि रजिस्ट्रार व प्रॉक्टर पाळणे, तसेच आरएसएसच्या इशाऱ्यावर इथल्या दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांना बाहेर काढणे हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.”

दरम्यान, आजही 2026 मध्ये वर्ध्यासारख्या शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एका युनिव्हर्सिटीमध्ये साजरी करू दिली जात नाही, यापेक्षा महाराष्ट्रासाठी दुसरी कोणती काळीमा फासणारी गोष्ट असू शकते? हा सरळ सरळ जातीवाद असल्याचा थेट आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us