नातं मध्ये येणार नाही, कोणत्याही परिस्थितीत सुजयचाच विजय : शिवाजी कर्डिले

अहमदनगर : भाजपकडून नगर दक्षिणसाठी डॉ. सुजय विखे, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहणारे शिवाजी कर्डिले कुणाला मदत करणार याविषयी चर्चा होती. पण कोणत्याही परिस्थितीत मी सुजय विखेंच्याच मागे राहणार असल्याचं शिवाजी कर्डिलेंनी टीव्ही 9 मराठीशी …

नातं मध्ये येणार नाही, कोणत्याही परिस्थितीत सुजयचाच विजय : शिवाजी कर्डिले

अहमदनगर : भाजपकडून नगर दक्षिणसाठी डॉ. सुजय विखे, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहणारे शिवाजी कर्डिले कुणाला मदत करणार याविषयी चर्चा होती. पण कोणत्याही परिस्थितीत मी सुजय विखेंच्याच मागे राहणार असल्याचं शिवाजी कर्डिलेंनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.

शिवाजी कर्डिलेंनी राष्ट्रवादीवर असणारा रागही व्यक्त केला. 2009 च्या निवडणुकीत मला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. पण राष्ट्रवादीच्याच लोकांनी मला पाडलं. राष्ट्रवादीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती. पण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला राहुरीतून विधानसभेसाठी तिकीट दिलं आणि पुन्हा राजकीय पुनर्वसन केलं. त्यामुळे संकटाच्या काळात मागे उभा राहिलेल्या भाजपशी दगाफटका करणार नाही, असं कर्डिलेंनी स्पष्ट केलं.

“भाजपने सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत सुजयचाच विक्रमी मताने विजय होईल. परमेश्वराने नातं लावलेलं आहे. त्यामुळे राजकारण आणि नातं हे दोन वेगवेगळे भाग आहेत. ज्यावेळी राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि निवडणुकीत जो शब्द सुजय विखे आणि सर्व संचालकाना दिला, तो आजपर्यंत पाळण्याचं काम केलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आणि मला विश्वासात घेऊन उमेदवारी दिली. वेगळं काहीही घडणार नाही, एकच घडेल की सुजय विखेंचा विक्रमी मतांनी विजय होईल”, असंही कर्डिले म्हणाले.

अहमदनगर महापालिका निवडणुकीतील भूमिकेबाबतही कर्डिलेंना प्रश्न विचारण्यात आला. यावरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिलं. महापालिका निवडणुकीत माझा फार हस्तक्षेप नव्हता. पण निकालानंतर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं, की महापौर आपला झाला पाहिजे, तेव्हा मी हस्तक्षेप केला, असं कर्डिले म्हणाले.

अहमदनगर महापालिका निवडणुकीत कर्डिलेंचे जावई आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी भाजपला मतदान केलं होतं, ज्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही.

VIDEO : पाहा कर्डिले काय म्हणाले?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *