सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंद होईल, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली इच्छा
Sunetra Pawar : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर राज्याचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी करावे अशी इच्छा राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने व्यक्त केली आहे.

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आपल्याला आनंद होईल असं विधान केले आहे.
काय म्हणाले दत्तात्रय भरणे?
राष्ट्रवादीचे नेते आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना म्हटले की, महाराष्ट्र वाट बघतोय की भारत देशात आपला मराठी माणूस एक नंबरच्या खुर्चीत बसावा. यशवंतराव चव्हाण, शरद पवार साहेबांना हुलकावणी मिळाली 2029 किंवा 2034 योग्य वेळी देशाचा प्रमुख महाराष्ट्राचा माणूस व्हावा अशी राज्यातील लोकांची इच्छा आहे. फडणवीस केंद्रात गेल्यावर राज्याचे नेतृत्व कोण करणार यावर बोलताना भरणे यांनी म्हटले की, याबाबतीत बोलणे उचित नाही, पण माझ्या पक्षाचा अध्यक्षा त्या खुर्चीवर बसण्याचा मला आनंद होणार आहे. सुनेत्रा पवार त्या खुर्चीवर बसल्या तर मला 100 टक्के पहिला आनंद मला होणार आहे.
जुलै अखेरपर्यंत राज्यात पाऊस पडणार
राज्यातील पावसाबाबत बोलताना दत्ता भरणे यांनी म्हटले की, हवामान विभागाचा अंदाज आहे की एल निनोचे संकट आहे. मुंबई, रायगडमध्ये मोठा पाऊस झाला, पण मराठवाडा, विदर्भामध्ये कमी पाऊस झाला. पाऊस चांगला पडावा ही सगळ्यांना अपेक्षा आहे. 70 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आव्हान आहे. मात्र महिन्याच्या अखेर चांगल्या पावसाची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही चर्चा
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करतील असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलेला आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आधीही राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे. तसेच त्यांना मंत्रिदाचा आणि प्रशासनाचाही मोठा अनुभव आहे. त्यामुळे जर आगामी काळात देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.