हिंदू समुदायाला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न अयशस्वी , मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर सुनील आंबेकर यांची प्रतिक्रिया

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण खटल्याच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं की, या निकालामुळे हिंदू समुदायाला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे.

हिंदू समुदायाला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न अयशस्वी , मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर सुनील आंबेकर यांची प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 31, 2025 | 7:29 PM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) स्वागत केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण खटल्याच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं की, या निकालामुळे हिंदू समुदायाला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गुरुवारी तब्बल 17 वर्षांनंतर मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयानं निकाल दिला आहे. 2008 साली घडलेल्या या घटनेमधून न्यायालयानं लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि माजी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयानं म्हटलं की, हे प्रकरण कोर्टात सिद्ध होऊ शकलं नाही, आरोपींना संशयाचा फायदा मिळण्याचा अधिकार आहे. यासोबतच या प्रकरणात UAPA कायद्याच्या तरतुदी लागू होत नाहीत. न्यायालयाच्या या निर्णयावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

 

नेमकं काय म्हणाले आंबेकर?

स्वार्थी हेतू, राजकारणातील स्वार्थ आणि वैयक्तिक हितसंबंधांसाठी संपूर्ण हिंदू धर्माला आणि समजाला दहशतवादाशी जोडण्याचा दृष्ट प्रयत्न करण्यात आला. पण न्यायालयानं आज दिलेल्या निकालामुळे हे सर्व प्रयत्न आणि आरोप निराधार ठरले आहेत. न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया या निकालावर आंबेकर यांनी दिली आहे.

दरम्यान दुसरीकडे न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हटलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ज्यांच्यावर आरोप करण्यात आले होते, त्या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे, हा सत्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.