
Sunil Tatkare On NCP Merger : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार होते, असा दावा शरद पवार यांच्या पक्षाकडून केला जात आहे. तर अजितदादांनी आम्हाला विलीनीकरणाबाबत कोणालाही सांगितलेले नाही, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते सांगत आहेत. असे असतानाच आता खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाच्या विलीनीकरणावर मोठे भाष्य केले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीचा दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. सोबतच त्यांनी राज्यसभेच्या सभापतींचीही भेट घेतली. नरेंद्र मोदी, अमित शाहा यांच्या भेटीदरम्यान खासदार सुनील तटकरे हेदेखील सुनेत्रा पवार यांच्यासोबत होते. ही भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना विलीनीकरणाच्या मुद्द्यावर थेट आणि मोठं भाष्य केलं आहे. “आमच्या पक्षाच्या भूमिकेचा प्रश्नच येत नाही. कारण मी वारंवार विचारत आहोत की विलीनीकरण कोणत्या पक्षात करायचे. दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. दादांच्या नेतृत्त्वात आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमची हीच भूमिका आजही आहे. आम्ही भविष्यातही एनडीएसोबत असू,” असे सांगत सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या कथित चर्चेला फेटाळून लावले.
एनडीएमध्ये येण्याबाबतची स्पष्टता कोणीतरी करणे आवश्यक आहे. आता विलीनीकरण किंवा काय होईल हा मुद्दा वेगळा आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आता सुनेत्रा पवार याच विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका होती. त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या सर्व बैठकांत आपण एनडीएत जायला हवे, असे अजितदादा नेहमी म्हणायचे. 2019 साली तीन पक्षांपेक्षा दोन पक्षांनी एकत्र आल्यास राज्याचा चांगला विकास होईल, असा अजितदादांचा विचार होता, असे सांगत भविष्यात आम्ही एनडीएत असणार आहोत, असं थेट विधान तटकरे यांनी केलं.