सर्वात मोठी बातमी… अजितदादा गट ठाकरे बंधूंच्या मोर्चात सामील होणार का?; सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं…

ठाकरे बंधू मराठी अस्मितेसाठी पाच जुलै रोजी मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढणार आहेत, या मोर्चाला राष्ट्रवादी अजित पवार गट पाठिंबा देणार का? पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? यावर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात मोठी बातमी... अजितदादा गट ठाकरे बंधूंच्या मोर्चात सामील होणार का?; सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2025 | 3:00 PM

राज वैशंपायन, प्रतिनिधी : राज्यात सध्या हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच तापला आहे,  हिंदी सक्ती आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पाच जुलै रोजी मुंबई भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघेही उपस्थिती राहणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शुक्रवारीच या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला आहे, त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गट देखील या मोर्चाला पाठिंबा देणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे? 

पाच जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताच नेता सहभागी होणार नाही. हा विरोधी पक्षाने काढलेला मोर्चा आहे,  त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भात काही भावना व्यक्त करायच्या असतील तर आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया  

दरम्यान या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार गटानं पाठिंबा दिला आहे, यावर देखील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह नाहीत, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता.

यावर उत्तर देताना ते म्हणाले की, मला याबाबत काहीच बोलण्याचं कारण नाही, राज्यातल्या निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचे ठरले आहे. असं असताना जर का कोणाला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर ते स्वतंत्र आहेत, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं आहे, त्या पद्धतीने आम्ही सामोरे जाऊ,

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन पाच मार्चला मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत, या मोर्चाचा महायुतीला फटका बसेल का? असा सवालही यावेळी तटकरे यांना करण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ठाकरे बंधूंच्या पाच जुलैच्या मोर्चाकडे मी राजकीय दृष्ट्या बघत नाही. लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे, परंतु ठाकरे बंधुच्या मोर्चाने राज्यात फार मोठा बदल किंवा मराठी मतांचं ध्रुवीकरण होणार नाही, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.