Delimitation Bill: एकीकडे आव्हाडांचे पाठिंब्याचे संकेत, दुसरीकडे सुप्रिया सुळेंची भूमिका वेगळी! डिलिमिटेशनवर पवार गटातच दोन मतप्रवाह?

Supriya Sule Clarifies NCP Position on Delimitation: परिसीमन विधेयकावर पवार गटातच मतभेद दिसून आला आहे. जितेंद्र आव्हाडांनी पाठिंब्याचा दावा केला आहे. मात्र मसुदा वाचल्याशिवाय निर्णय नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Delimitation Bill: एकीकडे आव्हाडांचे पाठिंब्याचे संकेत, दुसरीकडे सुप्रिया सुळेंची भूमिका वेगळी! डिलिमिटेशनवर पवार गटातच दोन मतप्रवाह?
Supriya Sule Says NCP MPs Will Decide After Discussing the Draft
| Updated on: Nov 27, 2026 | 7:27 PM

देशाच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या परिसीमन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतू आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या दाव्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. विधेयकाचा मसुदा वाचल्याशिवाय पक्ष कोणताही निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे परिसीमन विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच वेगवेगळे सूर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रस्तावित परिसीमन विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगितले होते. शरद पवार यांनी यापूर्वीच परिसीमन ही घटनात्मक प्रक्रिया असल्याचे सांगितल्याचा दाखला देत आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली. तसेच प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांमध्ये एकसमान 50 टक्के वाढ आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यांशी संबंधित तरतुदींना पाठिंबा देण्याबाबत पक्ष सकारात्मक असल्याचेही यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.

Loading...

मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर पक्षाच्या खासदारांची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित झाला. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप ठरलेली नसल्याचे स्पष्ट केले. संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या पक्षाची भूमिका सोमवारी फ्लोअर ऑफ द हाऊसवर तुम्हाला कळेल. विधेयकाचा मसुदा वाचल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. सर्वजण एकत्र बसून चर्चा करू. कदाचित जितेंद्र आव्हाडांनी 50 टक्के जागा आणि महिला आरक्षण यासंदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे विधान केले असेल. मात्र मसुद्यातील बारकावे वाचल्याशिवाय आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.

तसेच पक्षाने परिसीमन विधेयकाला पाठिंबा दिला आहे, असे म्हणणे अत्यंत चुकीचे असल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले. सर्व खासदार एकत्र बसून चर्चा करतील आणि त्यानंतरच पक्षाची भूमिका निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आव्हाड यांनी मांडलेली भूमिका आणि खासदारांची भूमिका यामध्ये नेमका समन्वय कसा साधला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात परिसीमन विधेयकावर चर्चा होण्यापूर्वीच पवारांच्या राष्ट्रवादीतील या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता सोमवारी पक्षाच्या खासदारांच्या बैठकीनंतर आणि विधेयकाचा मसुदा तपासल्यानंतर शरद पवारांचा पक्ष नेमकी कोणती भूमिका घेतो, हे स्पष्ट होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us