Zilla Parishad Election 2026 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश

Zilla Parishad Election 2026 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.

Zilla Parishad Election 2026 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
Supreme Court
| Updated on: Jan 12, 2026 | 2:41 PM

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु असताना राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. पण राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपुढे वाढवलेली नाही, तिथे 10 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी राज्य निवडणूक आयोगाकडून मागणी करण्यात आली होती.

ही मागणी आता सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. कोर्टाने अजून पाच दिवस जास्त दिले आहेत. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ज्या जिल्हा परिषदांमध्ये ओलांडली गेलेली नाही, त्या निवडणुका 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाला मिळालेला हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे असं म्हटलं जात होतं की, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु असताना जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागू शकतात, त्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाला थोडा दिलासा मिळाला आहे.

किती जिल्हा परिषदांसाठी हा आदेश

कोर्टाकडून हा दिलासा फक्त 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी आहे, ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्यापुढे ओलांडली गेलेली नाही. त्यासाठी दिलासा दिलेला आहे. इतर सर्व जिल्हा परिषदांबाबत पुन्हा 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरु आहे. महापालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी आहे. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

सध्या महापालिका निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. महापालिकेच्या आधी नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी घवघवीत यश मिळवलं. यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. नगराध्यक्ष निवडून आणण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. अजित पवार यांची राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर राहिली.

.