संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना मोठ्या मनाने माफ करणार आहात का?; सूर्यवंशी यांच्या भावाचा धस यांना सवाल

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या पोलिसांना माफ करण्याचं आवाहन केलं आहे. धस यांच्या या मागणीचा दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी कठोर शब्दात समाचार घेतला आहे. तुमचा मुलगा असता तर तुम्ही असंच केलं असतं का? संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांबाबतही तुम्ही हीच भूमिका घेणार का? असा संतप्त सवाल प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी केला आहे.

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना मोठ्या मनाने माफ करणार आहात का?; सूर्यवंशी यांच्या भावाचा धस यांना सवाल
| Updated on: Feb 10, 2025 | 2:41 PM

सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मोठं विधान केलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणातील आरोपी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा, असं आवाहन सुरेश धस यांनी केलं आहे. त्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना असंच मोठ्या मनाने माफ करणार आहात का? सोमनाथच्या जागी तुमचा मुलगा असता तर असंच माफ केलं असतं का? असा सवाल प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी सुरेश धस यांना केला आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. सुरेश धस सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीच्या रात्री 2 वाजता मला येऊन भेटले होते. मात्र धसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना फोटो न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. सुरेश धस तुम्ही चोर होते का? आज तुम्ही म्हणता मोठ्या मनानं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपी पोलिसांना माफ करा. तुम्ही संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना मोठ्या मनाने माफ करणार आहेत का? तुमच्या घरचा कोणी मेला असता तर तुम्ही माफ केलं असतं का? असा संतप्त सवाल प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी केला आहे.

पोलिसांचे आका कोण?

पोलिसांचे नेमके आका कोण हेच आम्हाला कळेना झालं आहे. सूर्यवंशी कुटुंब कधीच दोषी पोलिसांना माफ करणार नाही. तुम्ही पोलिसांची बाजू घेऊ नका. आमच्यावर काय दु:खाचा डोंगर कोसळला आम्हाला माहित आहे. सुरेश धस पूर्णपणे चुकीचे बोलले आहेत. याचे गुन्हे माफ करा, त्याचे गुन्हे माफ करा हे सांगण्यासाठीच जनतेने यांना निवडून दिले का? गुन्हेगारांना असं माफ करत गेलं तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं तर त्याला सरकार जबाबदार असेल काय? असा सवाल करतानाच सुरेश धस चुकीचं बोलत आहेत. त्यांनी चुकीचं बोलणं बंद केलं पाहिजे, असं सूर्यवंशी म्हणाले.

आमच्या सोमनाथला परत आणून द्या

सुरेश धस यांचा स्वतःचा मुलगा असता तर त्यांनी पोलिसांना माफ केले असते का? संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी धस यांनी एवढे परिश्रम घेतले आणि सोमनाथ सूर्यवंशी बाबत त्यांची वेगळी भूमिका कशी काय? हे दलालीचे धंदे बंद करा. चार पोलीस निलंबित केल्याने आम्ही समाधानी नाहीत, आज निलंबित करतील, उद्या कामावर घेतील. हे विद्यार्थ्यांचे असे खून होत असतील तर विद्यार्थी शाळा सोडून देतील. आताच विद्यार्थ्यांनी शस्त्र घेतले तर गुन्हेगारी किती वाढेल. त्यामुळे सुरेश धस तुम्ही चुकीचं बोलणं सोडून द्या. आम्ही ही गोष्ट खपून घेणार नाही. सत्याला न्याय मिळून द्या, तरच तुम्ही पुढे आमदार, खासदार होऊ शकतात. धस यांनी आमच्या सोमनाथला परत आणून द्यावं, असं ते म्हणाले.

त्या विधानाचं समर्थन नाही

लाँग मार्च नाशिकमध्ये असताना बातचीत करण्यासाठी आलेल्या सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा असा विधान केलं होतं. सुरेश धस यांच्या त्या विधानाचं लाँग मार्च समिती समर्थन करत नाही. धस जे बोलले ते चुकीचे बोलले. लाँ मार्च समिती दोषी पोलिसांना कठोर शासन होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. धस यांच्या त्या वक्तव्यावर आम्ही त्याच दिवशी नाराजी व्यक्त केली होती. ते चुकीचंच बोलले असं आम्ही म्हटलं होतं, असं आशिष वाकोडे यांनी म्हटलंय.