निंबाळकर यांची चौकशी करा, सातारा डॉक्टर प्रकरणात सुषमा अंधारेंची सर्वात मोठी मागणी!

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी यावेळी थेट काही पुरावेच सादर केले आहेत.

निंबाळकर यांची चौकशी करा, सातारा डॉक्टर प्रकरणात सुषमा अंधारेंची सर्वात मोठी मागणी!
sushama andhare
| Updated on: Oct 28, 2025 | 4:50 PM

Satara Doctor Death Case : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सातारा डॉक्टर महिलेचे मृत्यू प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले जात आहे. हा दावा करताना सुषमा अंधारे वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणाचा आधार घेत आहेत. असे असतानाच आता अंधारे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सातारा डॉक्टर प्रकरणात तपासाची कक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे. तसेच काही पुरावे दाखवले आहेत. निंबाळकर यांचीही चौकशी करायला हवी, असेही त्या म्हणाल्या आहेत.

चौकशीची कक्षा वाढवावी

माझ्या बोलण्याला काहीही अधार नाही, असे सांगितले जात आहे. पण सातारा डॉक्टर महिलेने काही पत्रं लिहिली होती. त्यांनी आरोग्य विभागाचे आपले वरिष्ठ डॉ. अंशुमन धुमाळ यांना पत्र लिहिले होते. खासदारांचे दोन पीए आहेत. एपीआय झायपात्रे, पीएसआय पाटील, अंशुमन धुमाळ, निंबाळकरांचे दोन पीए तसेच रणजितसिंह निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणावे, अशी माझी मागणी असल्याचे यावेळी अंधारे म्हणाल्या.

वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणाचा घेतला आधार

रणजितसिंह निंबाळकर हे आपल्या ताकदीचा वापर करून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत आहेत. अनेक गुन्हे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात. त्यांच्या प्रभावाखालीच हे गुन्हे दाखल होतात. वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणातही निंबाळकर यांचा समावेश आहे. वर्षा आणि हर्षा या दोघींनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये निंबाळकर यांचा अनेकदा उल्लेख आहे, असा दावा अंधारे यांनी केला. हा दावा करताना त्यांनी वर्षा आणि हर्षा यांची सुसाईड नोट वाचून दाखवली.

रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका

पुढे बोलताना त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली. महिला आयोगाला सातारा डॉक्टर महिलेचे चारित्र्य हनन करण्याचा कोणताही अधिकार नाही. महिलांचा एवढाच पुळका आहे तर वर्षा आणि हर्षा यांच्या प्रकरणात चाकणकर यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही? असा सवाल अंधारे यांनी केला. सोबतच चाकणकर यांना भाजपात उडी मारायची आहे म्हणून हे सगळं चालू आहे का? असे विचारत राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांना सांभाळावे, असा सल्ला दिला.

मी रोज पुरावे बाहेर काढणार

निंबाळकर यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर बोलताना मी निंबाळकर यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याला घाबरत नाही. मी रोज समोर येणार आणि पुरावे बाहेर काढणार. काय करायचे ते करा? असे थेट आव्हानच दिले आहे. त्यामुळे आता सातारा डॉक्टर महिला प्रकरणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.