अजितदादांच्या विमान अपघाताशी खरातचा संबंध आहे का? सुषमा अंधारे म्हणाल्या ज्या पद्धतीने समोर येतंय…

अजित पवार विमान अपघात प्रकरण आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांवरून सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकरांची नार्को टेस्ट करून त्यांना अटक करण्याची मागणी अंधारेंनी केली आहे.

अजितदादांच्या विमान अपघाताशी खरातचा संबंध आहे का? सुषमा अंधारे म्हणाल्या ज्या पद्धतीने समोर येतंय...
ajit pawar sushma andhare
| Updated on: Mar 20, 2026 | 12:11 PM

राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले होते. यानंतर सातत्याने याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली जात होती. त्यातच आता अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चर्चेने राजकीय वळण घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भोंदू बाबा अशोक खरात याच्या चौकशीची मागणी केली आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना टार्गेट करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

स्वतःला मर्चंट नेव्हीचा निवृत्त कॅप्टन सांगून आध्यात्मिक गुरुच्या वेषात महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणामुळे सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यातील संबंधांवरून विरोधक सातत्याने टीका करताना दिसत आहेत. आता याच प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही, पण हे गंभीर असे विधान केले आहे.

गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज

अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी त्यांचा बारामती आणि मुंबई येथील घराबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. या भाष्य करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, मुळात असं तंत्र-मंत्र केल्याने काही बिघडू शकतं किंवा घडू शकतं, यावर माझा स्वत:चा अजिबात विश्वास नाही. मात्र, ज्या पद्धतीने हे सर्व समोर येत आहे, ते पाहता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

जेव्हा दादांचा विषय येतो, तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे नेतृत्व जे अत्यंत संवेदनशील महिला नेत्याच्या हाती आहे, त्या सुनेत्रा पवारांनी तातडीने गांभीर्याने विचार करावा. कारण यामध्ये फक्त महिला आयोगाची नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचीही नाचक्की होतेय. त्यातले अनेक फोटोत राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्हही दिसतंय, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना सोडणार नाहीत

त्यांच्या पाया कोण पडतंय, पदराने पाय कोण पुसतंय, त्या एका लिंगपिसाट माणसाचे पाय पुसतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. महिला आयोगाचे अधिकार क्षेत्र इतके कधीही जास्त नव्हते, जेवढे त्याचे ग्लोरी आणि ग्लॅमर चाकणकरांच्या काळात वाढवले गेले. मात्र, जर लाडक्या बहिणींचे अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असेल आणि महिला आयोगाची अध्यक्ष त्याला पाठीशी घालत असेल, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना सोडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या संपूर्ण प्रकरणाचे सत्य बाहेर येण्यासाठी सुषमा अंधारे यांनी कठोर मागणी केली आहे. मला असं वाटतंय की त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. तसेच त्यांना अटक झाली पाहिजे. कारण त्यामुळे अनेक गोष्टी उघडकीस येतील, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. या आरोप-प्रत्यारोपामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Follow Us