बोलणी फिस्कटली, एसटी कामगारांचा १३ तारखेपासून चक्का जामचा इशारा
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी येत्या १३ ऑक्टोबरपासून आंदोलनावर जात असल्याने एसटीच्या सेवा बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एसटी कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी १३ ऑक्टोबर पासून चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे एसटी कामगारांशी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चर्चा केली. मात्र, या बैठकीत मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने एसटी कामगारांनी १३ तारखेपासून चक्का जामचा इशारा दिला आहे. यामुळे ऐन सणासुदीत एसटीचा संप होणार असून त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता फरक, वेतनवाढ फरक रक्कम, दिवाळी भेट रक्कम, सण उचल आदी मागण्यांचे फलक आणि पेटती मशाल हातात घेऊन राज्यातील ५०० पेक्षा जास्त एसटीतील कामगार प्रतिनिधींनी १३ ऑक्टोबर पासून होणाऱ्या आंदोलनाची झलक आज दादरच्या टिळक भवनात सादर केली. या टीझरचे सादरीकरण करताना एसटी कामगारांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. मुदतीपूर्वी प्रश्न सुटले नाहीत तर कर्मचारी आंदोलन तीव्र होईल असा इशाराही यावेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला.
एसटी कामगारांच्या चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच मशाल मोर्चा काढण्यात येणार असून तो १२ ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजल्यापासून होणार असून या आंदोलनाचे रूपांतर पुढे बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार आहे. त्याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये अशी आमची इच्छा असून प्रशासनाने सुद्धा याकडे गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे असे यावेळी बरगे यांनी सांगितले.
सन २०१६ पासूनचा एसटी कामगारांचा ११०० कोटी रुपयांचा महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नाही. वेतनवाढ फरकाची २३१८ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली नाही. या शिवाय १७००० हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच १२५०० सण उचल मिळाली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली.
थकीत रक्कमेचा आकडा चार हजार कोटी
अनेक प्रकारच्या देण्यांचा एकूण थकीत रक्कमेचा आकडा चार हजार कोटी रुपयांवर गेला असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,प्रत्येक कर्मचाऱ्याला ही रक्कम विभागून द्यायची झाली तर हा आकडा सरासरी तीन लाख ७७ हजार रुपये इतका होत आहे. ही संपूर्ण रक्कम हडप करण्याचा डाव प्रशासनाने रचला असून ही रक्कम कधी मिळेल हे प्रशासनाने जाहीर करावे नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होतील आणि दोलन तीव्र होईल असेही बरगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बोलणी फिस्कटली, आंदोलनावर ठाम
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत कामगार प्रतिनिधींची चर्चा झाली. पण त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सदरचा विषय कळवतो असे सांगितले. पण आजच्या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनावर ठाम असून १३ ऑक्टोबर रोजी, ठिय्या आंदोलन सुरू होईल आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला तर त्याची जबाबदारी आमची राहणार नाही असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.
