लाखो रुपयांना विकल्या चिंचेच्या बिया, मध, अंगठ्या.. अशोक खरात प्रकरणात ईडीकडून धक्कादायक खुलासे

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ईडीने धक्कादायक खुलासे केले आहेत. सर्वसामान्य अंगठ्या, मध आणि चिंचेच्या बिया या त्याने भक्तांना गंडवून लाखो रुपयांना विकल्याचा दावा ईडीने केला आहे.

लाखो रुपयांना विकल्या चिंचेच्या बिया, मध, अंगठ्या.. अशोक खरात प्रकरणात ईडीकडून धक्कादायक खुलासे
अशोक खरात
Image Credit source: Tv9
| Updated on: Aug 02, 2026 | 11:50 AM

‘दैवी शक्ती’च्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ईडीने अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर केले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, जवळपास 1 हजार रुपये किंमतीच्या पुष्कराज आणि डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी खरातने भक्तांना तब्बल 2.62 लाख रुपयांना विकले आहेत. या अंगठ्यांमुळे आर्थिक संकट दूर होईल, व्यवसायात भरभराट होईल आणि दैवी शक्ती लाभेल, असे त्याने दावे केले होते. इतकंच नव्हे तर इतरही काही वस्तू त्याने भक्तांना अलौकिक शक्ती आणि चमत्कारिक लाभांचं आश्वासन देत अव्वाच्या सव्वा किंमतीले विकले होते, असं ईडीने स्पष्ट केलं.

तपासात चिंचेच्या बिया सुमारे 100 प्रति किलो दराने खरेदी करून त्या 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत विकल्याचं समोर आलं आहे. तसंच 300 ते 500 रुपये प्रति लिटर किंमतीचा मध ‘दैवी मध’ म्हणून तब्बल 7 लाख रुपये प्रति लिटर दराने विकल्याचा दावा ईडीने केला आहे. सामान्य रत्नांना ग्रहदोष दूर करणारी आणि यश मिळवून देणारी ‘ऊर्जित’ रत्ने म्हणून लाखो रुपयांत विकण्यात आल्याचं तपासात नमूद आहे. या व्यवहारांतून जमा झालेला पैसा विविध बँक खात्यांतून फिरवून त्याचा स्रोत लपविण्याचा प्रयत्न झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे

  • एक हजार रुपयांचे पुष्कराज आणि डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी 2.62 लाख रुपयांना विकले
  • 100 रुपये प्रति किलो दराच्या चिंचेच्या बिया 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत विकले
  • 300 ते 500 रुपये प्रति लिटर किंमतीचा मध तब्बल 7 लाख रुपये प्रति लिटर दराने विकलं

जप्त केलेल्या अंगठ्यांचं मूल्यांकन केल्यानंतर त्या साध्या नकली दागिन्यांच्या स्वरूपातील असल्याचं समोर आलं. ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हा प्रकार संघटित आर्थिक फसवणुकीचा भाग असल्याचा दावा केला आहे. दरम्यान समता नागरी सहकारी पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी अशोक खरात याला न्यायालायने 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शहरातील शाखेत बोगस खाती उघडून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी आरोपी भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी अटक केली होती.

भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध महिला लैंगिक शोषणप्रकरणी आठ गुन्हे दाखल आहेत. भल्याभल्यांची मती गुंग करून त्यांची आर्थिक फसवणूक आणि शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा ताबा ईडीच्या विशेष पथकाने घेतला आहे. अशोक खरातला पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं असता आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने कोठडीची मागणी केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us