महाराष्ट्रभर झंझावात… पण सांगलीच्या तासगावमध्ये भाजपच्या अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त, कसं घडलं? मोठी खळबळ

सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अंतर्गत गटबाजी, संदीप गिड्डे पाटलांना डावलणे आणि तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या हस्तक्षेपाला या पराभवाचे कारण मानले जात आहे. भाजप पदाधिकारी स्वप्नील पाटलांच्या राजीनाम्याची किंवा हकालपट्टीची मागणी करत आहेत.

महाराष्ट्रभर झंझावात... पण सांगलीच्या तासगावमध्ये भाजपच्या अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त, कसं घडलं? मोठी खळबळ
सांगलीच्या तासगावमध्ये भाजपला धक्का
| Edited By: | Updated on: Dec 23, 2025 | 1:16 PM

देशात आणि राज्यात यशस्वी वाटचाल करणाऱ्या भाजपला सांगलीच्या तासगाव मध्ये जबरच धक्का बसला आहे. तासगावच्या नगरपालिका निवडणुकी मध्ये भाजपाचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांची निवडणूक लढणाऱ्या सर्व उमेदवाराचे डिपॉझिटच जप्त झाल्याने भाजप हादरलं असून पक्षाला आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. तासगाव भाजपात पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटलांना डावलल्याने भाजपवर नामुष्की ओढवली.

तर तासगाव नगरपरिषद निवडणुकीतील पराभवाला भाजप तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील जबाबदार असून त्यांचा राजीनामा घ्या अन्यथा हक्कलपटी करा अशी मागणी तासगाव भाजप पदाधिकारी आणि भाजप उमेदवारानी केली आहे. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करून ही मागणी करणार असल्याची माहिती यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.

हस्तक्षेप केल्याचा आरोप

तासगाव तालुक्यात शहर मंडल व ग्रामीण मंडल अशी वेगवेगळी संघटनात्मक रचना होती. असं असतानाही शहर मंडलमधील पूर्ण संघटना तसेच तासगाव शहरातील भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांना डावलण्यात आलं. आणि ग्रामीण मंडल अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी काहीही संबंध नसताना, तासगाव नगरपालिका निवडणूकीत पूर्ण हस्तक्षेप केला. तासगाव शहरातील भाजप संघटनेला आणि इच्छुक उमेदवारांना त्यांनी पूर्ण डावलले, तसेच पक्षाकडून आलेला निधी देखील तळापर्यंत वाटला नाही, भाजप पदाधिकाऱ्यांनी असा आरोप तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्यावर केला आहे.

म्हणून डिपॉझिट झालं जप्त

याचा परिणाम म्हणून पूर्ण राज्यात तासगाव ही एकमेव नगरपालिका अशी ठरली जिथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह संपूर्ण पॅनेलचे डिपॉसिट जप्त झाले. त्यामुळे सगळे जण निराश झाले असून संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणाची लेखी तक्रार करणार असून, त्यानंतर पालकमंत्री व पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.