
अख्खा महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होता, त्या ऐतिहासिक युतीची ठाकरे बंधूंनी आज घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत, युतीची घोषणा केली. तब्ब्ल 18 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले असून राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करताच टाळ्यांचा क़डकडाट झाला. मात्र युतीबाबत जाहीर केलं असलं तरी दोन्ही पक्षांतर्फे जागावाटपाची घोषणा झालेली नाही. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या महापालिका निवडणुकीत कुठे, किती जागा लढवणार यावर अद्यापही पडदा आहे. ते अद्याप घोषित करणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. आणि असं का ते कारणही त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले राज ठाकरे ?
‘आम्हाला जे काही बोलायचं आहे, ते आम्ही येत्या काळात जाहीर सभांमध्ये बोलूच. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी आधीही बोललो होतो, तिथूनच एकत्र येण्याची सुरूवात झाली. आमचे दोन्ही पक्ष , कोण किती जागा लढवणार, कुठे लढवणार , आकडा काय हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार नाही ‘ असं राज ठाकरे म्हणाले. त्याचं कारणंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘ महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहे. त्यात दोन जास्त टोळ्या ॲड झाल्या. त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात ‘ असा टोला यांनी लगावत राज यांनी ठाकरी शैलीत उत्तर दिलं. जे निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. कधी भरायची ती कळवली जाईल असं म्हणत शिवसेना आणि मनसेची युती झाली हे जाहीर घोषणा करत आहोत, असंही राज यांनी जाहीर केलं.
वरळीतील हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत युतीची घोषण करण्यापूर्वी राज व उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवनादन केलं. दोन्ही बंधूंनंतर रश्मी ठाकरे व शर्मिला ठाकरे तसेच आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांनीही पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
मुंबईत युती जाहीर, बाकीचं काय ?
आजच्या पत्रकार परिषदेत राज व उद्धव यांनी एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली.आम्ही मुंबईतील युती जाहीर करत आहोत, राज्यातील इतर पालिकांबाबत चर्चा सुरू असून जसे निर्णय होतील, तशी युती जाहीर करू, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असा विश्वासही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.