ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा? संजय राऊतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांवरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरेंची शिंदेंशी वाढलेली जवळीक आणि नगरसेवक पदाचा कोटा यावरून युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा? संजय राऊतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण
raj thackeray uddhav thackeray
| Edited By: | Updated on: Feb 22, 2026 | 11:26 AM

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीत मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरुन वादाची पहिली ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यात सध्या काहीच आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः स्वीकृत नगरसेवकांच्या कोट्यातून मनसेला अपेक्षित असलेली जागा मिळालेली नाही. त्यामुळे मनसे नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यामुळे युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे.

मनसेकडून एका स्वीकृत नगरसेवकाची मागणी

मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंकडून ३ स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित करण्यात आली आहे. ही नावे प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या जागांचे वाटप करताना मनसेला विश्वासात घेतले गेले नसल्याची प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे. युती धर्म पाळून या ३ पैकी एक जागा मनसेच्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली होती. मात्र, ठाकरे गटाने आपल्याच नेत्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मनसेकडून कोत्या मनोवृत्तीची माणसं अशा शब्दांत टीका करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंसोबत राज ठाकरेंची जवळीक

फक्त नगरसेवक पदाचा प्रश्नच नाही, तर राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. हे देखील वादाचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांची शिंदे गटाशी असलेली जवळीक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मान्य नाही. या नव्या राजकीय समीकरणामुळे दोन्ही पक्षांतील दरी अधिक रुंदावली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

या वादावर संजय राऊत यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. महापालिकेचे राजकारण हे वेगळे असते आणि आमचे पक्षाचे काम वेगळे आहे. मी वैयक्तिकरित्या कधीही महापालिकेच्या राजकारणात किंवा या नियुक्तीच्या प्रक्रियेत पडलेलो नाही. महापालिकेत काय चालते हे सर्वांना माहित आहे, त्यामुळे आम्ही त्या तलावाच्या बाहेर राहणे पसंत करतो. मात्र, मनसे आणि आमची युती आजही टिकून आहे. या विषयावर अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व घेईल, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान संजय राऊत यांनी जरी युती कायम असल्याचे म्हटले असले तरी त्यांनी या वादावर थेट उत्तर देणे टाळले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.