
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी एकूण 29 महानगरपालिका निवडणुकींसाठी मतदान होत आहे. तर 16 जानेवारी रोजी निकाल लागेल. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या महापालिकांच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे. यातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेत कोण बाजी मारणार, याची तर सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ठाण्यात आपले प्रभुत्त्व कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या पक्षाने पूर्ण ताकद लावली आहे. असे असतानाच आता शिंदे यांना ठाण्यात जबर हादरा बसला आहे. कधीकाळी एकनाथ शिंदे यांच्या अंत्यत जवळच्या सहकारी म्हणून ओळख असलेल्या ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी आणि ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या महिला आघाडी जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आपण या पदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे यावेळी त्यांनी पत्रात नमूद केले आहे. उपमुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांनी महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे तर्क वितर्क लढवले जात असून राजीनामा का दिला याचे मूळ कारण अजूनही समजू शकले नाही. मात्र हा शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
ठाणे महानगरपालिका एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. काहीही झालं तरी या महानगरपालिकेत महायुतीचाच झेंडा फडकला पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे तसेच भाजपा पूर्ण ताकद लावत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच महाविकास आघाडीचे इतर घटकपक्ष शिंदे यांचा हा गड भेदण्यासाठी कामाला लागले आहेत. असे असताना आता मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. आता त्या शिवसेना पक्षातून बाहेर पडून अन्य पक्षात प्रवेश करणार का? त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत? या सर्व पक्षांची उत्तरं सध्यातरी गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.