ठाणेकरांचे हाल होणार! खाजगी बस मालकांनी पुकारला बेमुदत संप

खाजगी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दोन जुलैपासून संप पुकारण्यात आलेला आहे. आज ठाण्यात बस मालक सेवा संघटनेची बैठक पार पडली, यामध्ये हा संपाचा निर्णय घेण्यात आला.

ठाणेकरांचे हाल होणार! खाजगी बस मालकांनी पुकारला बेमुदत संप
Bus Strike
| Updated on: Jun 30, 2025 | 9:04 PM

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात ठाण्यातील वॉटर टँकर असोसिएशनने अचानक संप पुकारला होता. त्यानंतर आता खाजगी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दोन जुलैपासून संप पुकारण्यात आलेला आहे. खाजगी बसचालक मालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने येत्या दोन जुलैपासून सरकारच्या विरोधात संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. आज ठाण्यात बस मालक सेवा संघटनेची बैठक पार पडली यामध्ये हा संपाचा निर्णय घेण्यात आला.

ठाणे जिल्ह्यात एकूण साडेचार हजार खाजगी बस कार्यरत असून यातील काही बस शालेय विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी, तर काही चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात. काही बस या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. सध्या पावसाळा सुरू आहे त्यातच आषाढी वारी देखील सुरू आहे. शाळा नुकत्याच सुरू झालेले आहेत त्यामुळे बसचे महत्वही वाढले आहे. मात्र आता संपामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

आता ई चलन आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बस मालक सेवा संघ आक्रमक झाला असून येत्या दोन जुलैला बस मालक सेवा संघाचा संप असणार आहे. इ चलन सक्त वसुली, पार्किंग, प्रवेश बंदी खाजगी प्रवासी वाहतूक, बस थांबे ,प्रलंबित इ चलन रद्द , महामार्गावरील ओवर स्पीड चलन या काही प्रमुख जाचक सरकारी धोरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे.

ठाण्यातील जवळपास सर्वच बसचालक आणि मालक या संपात सहभागी होणार आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा संप सुरु असणार आहेत, असे बस मालक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या संपामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.