दारात उभा राहिला, ट्रेनचा स्पीड वाढला अन् अचानक…; पुण्याच्या तरुणाचा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, क्षणार्धात तरुणाचे दोन्ही पाय झाले वेगळे

ठाणे रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. या भीषण अपघातात तरुणाने आपले दोन्ही पाय गमावले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दारात उभा राहिला, ट्रेनचा स्पीड वाढला अन् अचानक...; पुण्याच्या तरुणाचा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, क्षणार्धात तरुणाचे दोन्ही पाय झाले वेगळे
thane
| Updated on: Apr 01, 2026 | 7:40 AM

रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, याचा भीषण प्रत्यय नुकताच ठाणे रेल्वे स्थानकावर आला. पुणे-मुंबई मेल ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करताना भीषण अपघात झाला. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या फटीत अडकल्यामुळे या तरुणाचे दोन्ही पाय वेगळे झाले. सध्या त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण पुणे येथून मेल ट्रेनने आला होता. त्याची एक्सप्रेस गाडी ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर आली. ट्रेन पूर्ण थांबण्यापूर्वीच आणि पुन्हा सुरू झाल्यानंतरही तो दरवाजावर उभा राहून हवेत लोंबकळत स्टंटबाजी करत होता. यानंतर गाडीने वेग पकडला. त्यातच अचानक त्याचा हात निसटला आणि तो थेट रुळांच्या दिशेने खेचला गेला. यानंतर तो थेट प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनमधील जीवघेण्या फटीत कोसळला.

प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, संबंधित तरुण दारूच्या नशेत होता. तो दारात उभा राहून धोकादायक हालचाली करत असताना काही सहप्रवाशांनी त्याला धोक्याची सूचना दिली होती. तसेच काहींनी त्याला आत ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र नशेत असल्याने त्याने कोणाचेही ऐकले नाही. तो खाली पडताच स्थानकावर किंकाळ्या आणि आरडाओरडा सुरू झाला. ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अरुंद जागेत अडकल्याने त्याच्या पायांवरून गाडीची चाके गेली.

तात्काळ मदत कार्य

या घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) जवानांनी आणि लोहमार्ग पोलिसांनी (GRP) घटनास्थळी धाव घेतली. त्याने एक्सप्रेस ट्रेन थांबवून या तरुणाला अतिशय गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला तातडीने स्ट्रेचरवरून प्लॅटफॉर्मबाहेर नेऊन रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे जाहीर केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रेल्वे प्रशासनाचा इशारा

या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अपघाती घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच प्रवाशांना पुन्हा एकदा कडक शब्दांत ताकीद दिली आहे. स्टंटबाजी करणे हा केवळ गुन्हा नसून तो आत्महत्येसारखा प्रकार आहे. तुमचा एक क्षणभराचा थरार तुमच्या कुटुंबासाठी आयुष्यभराचे दुःख ठरू शकतो, त्यामुळे कृपया रेल्वेचे नियम पाळा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

Follow Us