ठाण्यातही शाळेची घंटा वाजणार; 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू

| Updated on: Oct 01, 2021 | 10:22 AM

मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातही शाळेची घंटा वाजणार आहे. ग्रामीण भागातील इयत्ता 5 ते 12 आणि नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 8 ते 12चे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. (thane Schools)

ठाण्यातही शाळेची घंटा वाजणार; 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

ठाणे: मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातही शाळेची घंटा वाजणार आहे. ग्रामीण भागातील इयत्ता 5 ते 12 आणि नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 8 ते 12चे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता 5 ते 12 आणि नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 8 ते 12चे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान शाळा सुरू करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी संबंधिताना दिले.

लसीकरण आवश्यक

शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. ज्या शिक्षकांचे लसीकरण अद्यापही पूर्ण झालेले नाही अशा शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक  लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी आरोग्य विभागास दिले. तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांची साफ सफाई, सॅनिटायझर फवारणी तसेच स्वच्छताविषयक कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही नार्वेकर यांनी संबंधिताना दिले आहेत.

मुंबईतील फॉर्म्युला काय?

मुंबईतील शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळांचं सॅनिटाईजेशन करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत 76 टक्के शिक्षकांचं लसीकरण झालं असून सर्वच शिक्षकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल त्या ठिकाणी एसओपीचं पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिली आहे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

बच्चू कडू काय म्हणाले?

एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या 4 तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील.

आताच निर्णय झाला आहे. त्यामुळे कोणत्या वर्गापासून शाळा सुरु होणार हे निश्चित सांगता येणार नाही. सोशल मीडियावर अनेक पालक तसेच विद्यार्थ्यांनी शाळा सुरु कराव्यात अशी मागणी केली होती. काही संघटनांनीदेखील मागणी केली होती. सर्व गोष्टींचा निर्णय घेऊनच आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या काळात जशी आपण काळजी घेतली होती, त्याच धर्तीवर शाळा सुरु करण्यासंदर्भात काळजी घेतली जाईल. कुठे रुग्णसंख्या वाढलीच तर आपण लगेच तपासणी करुन घेऊ, असं बच्चू कडू म्हणाले होते.

 

संबंधित बातम्या:

मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

मोठी बातमी ! राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

(After 1.5 years, Thane schools, junior colleges to open on October 4)