KDMC: केडीएमसीत भाजप-सेनेत धुसफूस, या पदासाठी मोठी रस्सीखेच, राजकीय घडामोडींना वेग, कुणाचं पारडं जड?

KDMC BJP-Shivsena: कल्याण डोंबिवली महापालिकेत आता स्थायी समिती सदस्य, सभापती आणि सभागृह नेते पदावरून मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. १६ फेब्रुवारीला केडीएमसीची महासभा होत आहे. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि सेनेत या पदांसाठी मोठी फिल्डिंग लागली आहे. काय आहे अपडेट?

KDMC: केडीएमसीत भाजप-सेनेत धुसफूस, या पदासाठी मोठी रस्सीखेच, राजकीय घडामोडींना वेग, कुणाचं पारडं जड?
केडीएमसीत भाजप-सेनेत धुसफूस
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 11, 2026 | 10:48 AM

KDMC BJP-Shivsena: कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर आता स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता या दोन महत्त्वाच्या पदांवरून राजकीय वातावरण तापले आहे. येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणार्‍या महासभेपूर्वीच शिवसेना आणि भाजपामध्ये या पदांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता पद भाजपालाच मिळावे या मागणीने वातावरण तापले आहे. तर शिवसेनेनेही या दोन्ही पदांवर आपला दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे आता या पदांबाबत महायुतीतील वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय घडामोडींना वेग

येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेत स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे. त्यानंतर सभापती पदाची निवड होईल. महापौर पद शिवसेनेकडे आहे. शिवसेना आणि मनसे मिळून ५९ सदस्य आहेत. आता स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता या दोन्ही पदावर दावा सांगितला आहे. तर भाजपने देखील या दोन्ही पदांवर आपला हक्क सांगितला आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता पद भाजपालाच मिळावे अशी मागणी केली आहे.

भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना वाटतं आपल्या पक्षाचा सभापती झाला पाहिजे सभागृह नेताही झाला पाहिजे. त्या दृष्टीने आमच्या कोर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत असा निर्णय झाला की भाजपच्या नगरसेवकाला स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेत पद मिळावं. वरिष्ठांच्या चर्चा सुरू आहेत. महायुती असल्याने भाजपचीही प्रामुख्याने या पदाबाबत मागणी आहे. शिवसेनेच्या महापौर, भाजपचा उपमहापौर झाल्याने स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते भाजपचा व्हावा अशी मागणी आहे. आम्ही महायुतीत आहोत आमचे 50 त्यांचे 53 आम्ही वाटाघाटीला बसल्यानंतर स्थायी समिती सभापती भाजपलाच मिळणार हा ठाम विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.

सभागृहात महिलाराज आणणार?

दरम्यान, शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, शिवसेनेचा महापौर झाल्यास स्थायी समिती भाजपला मिळाला पाहिजे हे भाजपकडून बोलले जात आहे. त्यांची बैठक देखील या प्रकरणात झाली आहे शिवसेना-भाजप महायुतीत आहे त्याबाबत निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे बसून निर्णय घेतील. शिवसैनिक म्हणून स्थायी समिती सभापती हा शिवसेनेचाच राहिला पाहिजे. भाजप आग्रही असेल तर शिवसेना देखील आग्रही आहे. शहर प्रमुख म्हणून मी देखील आग्रही आहे. ही पदे शिवसेनेलाच मिळाला पाहिजे. गणित मांडायचे असतील तर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत मांडली असती. मात्र शिवसेना भाजप महायुतीत आहेत. त्यामध्ये आम्ही लढलो. युती धर्मा आम्ही पाळत आहोत. त्यामुळे हा निर्णय लवकरच होईल. 16 तारखेला सदस्याची नेमणूक होणार. त्याच्यानंतर सभापती आणि बाकीचे पद बाबत निर्णय होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र मध्ये राज्यामध्ये महिलाराज आणलेला आहे या पुढची पद देखील महिलांना देणार असल्याचं माहिती त्यांनी दिली.

महापौर निवडीनंतर आता केडीएमसीतील स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता या दोन महत्त्वाच्या पदांसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये राजकीय चुरस वाढली आहे. त्यामुळे येत्या १६ फेब्रुवारीच्या महासभेनंतर या दोन्ही पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us