
दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी राज्य दणाणून गेले आहे. दोन वाघ एकत्र येणार असे दोन्हीकडील कार्यकर्ते, पदाधिकारी सांगत आहेत. चर्चेच्या गुऱ्हाळातून अजून गोडव्याची भेली मात्र बाहेर आलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी संदेश नाही तर थेट बातमी देणार असा सांगावा देऊनही आता पाच दिवस उलटले आहे. सगळेच जण त्या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. इकडे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकीय समीकरणांना मोठा वेग आला आहे. त्यातच एका बॅनरची राज्यभर चर्चा सुरू आहे. काय आहे ते बॅनर, त्यावरील मजकूर का ठरतोय चर्चेचा विषय?
देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत
‘देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत’ अशा आशयाच्या या बॅनरची राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्यापूर्वी या बॅनरवर अजून एक ओळ आहे. त्यावरून एकूणच हा प्रकार काय हे समोर येते. दोन मराठी वाघाने एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे, असा मजकूर ठळकपणे त्यावर नोंदवण्यात आला आहे. हे बॅनर अर्थातच मंत्री नितेश राणे यांना डिवचण्यासाठी लावण्यात आले आहे.
ठाण्यातील तिन हात नाक्यावरील बॅनर
या बॅनरवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. ठाण्यातील तिनं हात नका येथे ठाकरे गटाकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मी तुषार दिलीप रसाळ कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप) असा मजकूर त्यावर आहे. तुषार रसाळ यांच्या या बॅनरची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. हा बॅनर मंत्री नितेश राणे यांच्या धाराशिवमधील वक्तव्यानंतर लावण्यात आला आहे.
काय होते नितेश राणे यांचे वक्तव्य
धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांनी शिंदे सेनेवर टीका केली होती. ‘सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय, सगळ्यांनी लक्षात ठेवा’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांचा रोख अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर होता. त्यांच्या वक्तव्यामुळे पुढे प्रकाश महाजन आणि नारायण राणे हा वादही उभ्या महाराष्ट्राने पाहिला.
तर त्यापूर्वी तुळजापूरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेची त्यांनी खिल्ली उडवली होती. आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे 20 आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे अशा शेलक्या शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर टीका केली होती.