
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात घातला. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले असा दावा नाईकांनी केला. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये धुसफूस दिसून येत आहे. पालघरमधील दुर्वेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन वेळी ते बोलत होते. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही. पण ज्यांना ती लागलेली आहे, त्यांनी ती योग्यरित्या टिकवली पाहिजे, असा टोलाही नाईकांनी शिंदेंना हाणला.
काय दिला सल्ला
प्रत्येकाचे नशीब आहे. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली ही आनंदाची गोष्ट आहे. पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमवलं आणि कसं कमवलं आणि किती टिकवलं हे महत्त्वाचं आहे, असा चिमटा गणेश नाईक यांनी काढला. नाईक हे गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि त्यांच्या मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. गणेश नाईकांचे जनता दरबारही कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरले आहे. त्यावरून शिंदे सेनेला विरोधकांनी डिवचले सुद्धा आहे.
जनसामान्यांची नजर असतेच
पालघरसह एकत्रित असलेल्या ठाणे जिल्ह्याचे आपण पालकमंत्री होतो. त्यावेळी विष्णु सावरा, खासदार चिंतामण वनगा हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत असायचे. विद्यामान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या बैठकीत असायचे. पण शिंदेंना लॉटरी लागली. प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे. प्रत्येकालाच लॉटरी लागते असे होत नाही. पण प्रत्येकाला कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. तुम्ही कमावलेलं कसं टिकवता यावर जनसामान्यांची नजर असते, असे सूचक विधानही नाईकांनी केले.
आता प्रत्युत्तर काय देणार
वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या या टोलेबाजीला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि परिसरातील नेतृत्वावरून वाद सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा दिसतो की महायुतीमधील दोन घटक पक्षांना यश मिळते यासाठी काही नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यापूर्वची महायुतीमधील नेत्यांमधील फटकेबाजी चर्चेचा विषय ठरत आहे.