VIDEO | शिंदेंची ताकत असलेल्या ‘या’ दोन मतदारसंघांवर भाजपाचा डोळा, आतापासून सुरु केली मागणी

| Updated on: Sep 13, 2023 | 1:49 PM

महायुती एनडीएचा भाग आहे. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष आहेत. त्यांच्यात अजून जागा वाटपाची बोलणी सुरु झालेली नाहीत.

VIDEO | शिंदेंची ताकत असलेल्या या दोन मतदारसंघांवर भाजपाचा डोळा, आतापासून सुरु केली मागणी
eknath shinde
Follow us on

सिंधुदुर्ग : पुढच्यावर्षी देशात लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आतापासूनच सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. इंडिया आणि एनडीए या दोन आघाड्या आकाराला आल्या आहेत. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीत 26 पेक्षा जास्त पक्ष आहेत. एनडीएमध्येही अनेक पक्ष आहेत. निवडणुकांचे दिवस जस-जसे जवळ येऊ लागतील, तसतसा या आघाड्यांचा विस्तार आणखी होण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. यात जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा ठरु शकतो. राज्यात सध्या महायुतीच सरकार आहे. ही महायुती एनडीएचा भाग आहे. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष आहेत. त्यांच्यात अजून जागा वाटपाची बोलणी सुरु झालेली नाहीत.

पण महायुतीमधील पक्षांनी आतापासूनच काही जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण कसं वळण घेणार? याची उत्सुक्ता आहे. भारतीय जनता पार्टीचे कोकणातील नेते प्रमोद जठार यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडे ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. “सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असलेल्या लोकसभेच्या दोन जागा ठाणे आणि रत्नागिर-सिंधुदुर्ग भाजपाला मिळाव्यात अशी आग्रहाची मागणी आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात आम्ही ठाण मांडून काम करतोय. प्रत्येक बुथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे या दोन जागा भाजपाला सोडाव्यात” अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली आहे.

या दोन जागा भाजपासाठी सोडतील का?

प्रमोद जठार यांनी लोकसभेच्या ज्या दोन जागांची मागणी केलीय, तिथे एकनाथ शिंदे यांची चांगली ताकत आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सध्या ठाण्यातून राजन विचारे खासदार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत खासदार आहेत. हे दोन्ही खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. किरण सामंत हे उदय सामंत यांचे सख्खे बंधू आहेत. रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांची ताकत आहे. त्यामुळे खरच एकनाथ शिंदे या दोन जागा भाजपासाठी सोडतील का? हा खरा प्रश्न आहे.