सफाई कामगारांची भरती प्रक्रिया राबवा; राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या ठाणे पालिकेला सूचना

| Updated on: Sep 30, 2021 | 1:13 PM

ठाण्यातील सफाई कामगारांना वैद्यकीय सुविधा द्या, त्यांच्या पीएफचा प्रश्न सोडवा आणि सफाई कामगारांची नवीन भरती प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने ठाणे महापालिकेला दिल्या आहेत. (National Commission For Safai Karamcharis visit thane corporation)

सफाई कामगारांची भरती प्रक्रिया राबवा; राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या ठाणे पालिकेला सूचना
National Commission For Safai Karamcharis
Follow us on

ठाणे: ठाण्यातील सफाई कामगारांना वैद्यकीय सुविधा द्या, त्यांच्या पीएफचा प्रश्न सोडवा आणि सफाई कामगारांची नवीन भरती प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने ठाणे महापालिकेला दिल्या आहेत. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांनी काल ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अश्विनी वाघमळे, जिल्हा प्रशासन अधिकारी प्रशांत रसाळ आदी उपस्थित होते. तसेच उप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर, कार्यकारी अभियंता भारत भिवापूरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सूर्यवंशी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॅा. भीमराव जाधव, कार्मिक अधिकारी जी.जी.गोदापुरे आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

आयोगाने घेतला आढावा

ठाणे महापालिकेने सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधांची माहिती आयोगाला देण्यात आली. तसेच महापालिकेच्या घनकचरा व मलनिःसारण विभागांतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्त्या आदींबाबत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सविस्तर माहिती आयोगाच्या सदस्यांना माहिती दिली.

आयोग समाधानी

दरम्यान ठाणे महापालिकेच्यातीने सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. शहराचे सौंदर्य ठिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना डॉ.पी.पी.वावा यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, पी एफ, नवीन भरती प्रक्रिया तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक सुविधेबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

 

संबंधित बातम्या:

पाऊस थांबताच ठाण्यात पुन्हा फेरिवाला हटाव सुरू; अनधिकृत इमारतींवरही हातोडा

बदलापुरात प्रदूषण करणारी ‘ती’ कंपनी अखेर सापडली, तातडीने उत्पादन थांबवण्याची नोटीस

राज्यात पावसाने दाणादाण, अजित पवार म्हणाले, केंद्राने मदत करावी, आता रोहित पवारांनी थेट मोदींचं दार ठोठावलं!

(National Commission For Safai Karamcharis visit thane corporation)