Pradeep Purnekar: तो टल्ली… प्रदीप पुर्णेकरांची हत्या केली कोणी? आरोपी पप्या शिंदेच्या आईचा मोठा गौप्यस्फोट, ते नाव घेत…
Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील मानपाडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात आता आरोपी पप्या शिंदे याच्या आईने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्या आरोपीचे नावच त्यांनी थेट सांगितले आहे.

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, टीव्ही 9, मराठी: ठाण्यातील मानपाडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. मनोरमा नगर परिसरातील कार्यालयात ते असताना रात्री 9:32 च्या सुमारासा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. शस्त्राने वार करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी काल प्रकाश उर्फ पप्या शिंदे आणि आकाश यांना ताब्यात घेतले. याप्रकरणात आरोपी पप्या शिंदे यांच्या आईने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी त्या आरोपीचे नावच सांगितले आहे.
मुख्य आरोपीला अगोदर अटक करा
“मुलाला कोर्टात जाऊन भेटले. तो रडत आहे. प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. त्याला जर कट कारस्थानाविषयी माहिती असती तर तो कार्यालयाकडे गेला नसता. प्रदीप पुर्णेकर यांना उचलून दवाखान्यात नेले नसते. माझ्या मुलाला खरोखर काही माहिती नाही. हे केवळ राजकारण सुरू आहे. जर त्याला मारायचंच असतं तर तो तिथं थांबला असता का? इतकं तरी बाळूदादाच्या घराच्यांना कळायला हवं. आमचे घरच्यासारखे संबंध आहेत. पूजेच्या दिवशी बाळूदादा, जयनाथदादा, राम माझ्याकडे आले होते. बाळूदादा माझ्या घरी येऊन जेवले. आज आठदिवसाची गोष्ट आहे. लहानपणापासून आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या डोळ्यादेखत बाळूदादाला गोळ्या घातल्या म्हणून पप्या रडत आहे. आम्हाला खूप वाईट वाटत आहे. पप्याचा यामध्ये हात आहे, हे संपूर्ण खोटं आहे. यामधील सर्व सत्य बाहेर यायला पाहिजे. मुख्य आरोपीला अगोदर अटक झाली पाहिजे, तेव्हा माझ्या मुलाची त्यातून सुटका होईल.” असे पप्या शिंदे याची आई म्हणाली.
तो टल्ली, पप्या शिंदे याच्या आईचा रोख कुणावर?
हल्लेखोरांना माझा मुलगा काही खुणावत नव्हता. तो स्पीड ब्रेकरजवळ उतरला होता. हे तुम्ही सीसीटीव्ही पाहू शकता. जर तो याप्रकरणात असता तर तो तिथं थांबला नसता आणि त्यानं त्याला उचलून दवाखान्यातही नेलं नसतं. तो काल खूप रडत होता. गुन्हा केला असता पोलिसांनी आमच्या घराला संरक्षण दिलं असता का? मित्राने विश्वासघात केला असे जे पुर्णेकर म्हणत आहेत. ते पूर्ण चुकीचं आहे. मी जयनाथ दादांना भेटायला जाणार आहेत. माझ्या मुलाने असं काही केलं नाही. जर त्याचा हात असेल तर त्याला फाशी द्या, असे प्रकाश शिंदे याच्या आईने सांगितले.
तो टल्ली जो कोणी मित्र आहे ना, तो मिनाक्षी शिंदे यांचा माणूस आहे. माझा लहान मुलगा प्रकाशला त्या लोकांसोबत जास्त संबंध ठेऊ नकोस असे सांगत होता. तो टल्ली वारंवार घरी यायचा आणि त्याला घरून घेऊन जायचा. आरोपीच्या गाडीवर बसून पप्या आला हे आम्हाला मान्य आहे. पण त्याला या हल्ल्याची काहीच माहिती नव्हती. तो टल्ली जो आहे, तो मिनाक्षी शिंदे यांच्याकडेच असतो. या हत्येत मिनाक्षी शिंदे यांचा हात आहे हे मी सांगू शकत नाही. या टल्लीने आमच्या घरात, दोन भावात भांडणं पण लावली आहेत. काल पप्याला भेटले तो ही त्या टल्लीचे नाव घेत होता. त्या टल्लीने हे सर्व घडवून आणलं. त्याला पकडलं की मी निर्दोष सुटेल असे तो सांगत होता, असे आरोपी प्रकाश शिंदे याच्या आईने माहिती दिली.
