Thane| ठाणेकरांनो रस्त्यावरून चालताय… सावधान! शहरात 103 झाडे धोकादायक

| Updated on: May 27, 2022 | 10:19 AM

पावसाळा सुरू झाला की अनेक महाकाय वृक्ष उन्मळून पडतात.पालिकेने पावळापूर्व केलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल 103 झाडे धोकादायक असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

Thane| ठाणेकरांनो रस्त्यावरून चालताय... सावधान! शहरात 103 झाडे धोकादायक
तब्बल 103 झाडे धोकादायक
Follow us on

पालिकेच्या सर्वेक्षणात माहिती समोर

ठाणेकरांनो रस्त्यावरून चालताय…तर सावधान. पालिकेने पावळापूर्व केलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल 103 झाडे धोकादायक असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सोसायट्या तसेच रस्त्याच्या कडेला असलेली झाडे केव्हाही कोसळू शकतात. पावसाळ्यात सुटणाऱ्या वादळीवाऱ्यात ही झाडे कोसळण्याची शक्यता आहे. झाडाच्या फांद्या देखील उन्मळून पडण्याचा धोका आहे. त्यामुळे युद्धपातळीवर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्यास सुरूवात केली आहे.

ठाण्यातील झाडे बनली धोकादायक

पावसाळा सुरू झाला की अनेक महाकाय वृक्ष उन्मळून पडतात. यामुळे अनेक जण गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. तर काहींना यात आपला जीव ही गमवावा लागतो. तर यात कधी गाड्यांचे ही प्रचंड नुकसाना होते. काही वर्षांपूर्वी पाचपखाडी परिसरात दुचाकीवरून जाणारे वकील किशोर पवार यांच्या अंगावर झाड कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता. तर मासुंदा तलाव येथे धावत्या रिक्षावर पडलेल्या झाडामुळे रिक्षाचलकासह प्रवासी अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. नुकतेच 22 मे रोजी घोडबदंर रोडवरून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांवर अचानक झाडाची फांदी तुटून पडली. त्यामध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले. अशा असंख्य घटना दिवसाआड घडत असतात. अशातच पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात 103 झाडे धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात असून फांद्या छाटण्याची कामे लवकर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा

1 हजार 76 झाडांच्या फांद्या छाटल्या

ठाण्यातील धोकादायक झालेल्या झाडांच्या आजूबाजूची माती निघून गेल्यामुळे ती धोकादायक बनली आहेत. या झाडांच्या ठिकाणी माती टाकण्यात येत असून झाडांचे मजबुतीकरण करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे, तर 1 हजार 76 झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. झाडांचे पुनर्रोपन शक्य असेल अशा ठिकाणी पुनर्रोपन केले जात आहे. मात्र ज्या ठिकाणी काहीच शक्य नाही, तेथील झाडे काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.