आधी उल्हास नदीला पूर, आता जलशुद्धीकरण प्रकल्प बंद, बदलापूरकरांवर ‘पाणी’ संकट

बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बॅरेज जलशुद्धीकरण प्रकल्पात कालच्या (22 जुलै) पुरामुळे उल्हास नदीचं पाणी घुसलं. त्यामुळे या प्रकल्पातील फिल्टरेशन प्लॅन्ट अजूनही पाण्याखाली आहे.

आधी उल्हास नदीला पूर, आता जलशुद्धीकरण प्रकल्प बंद, बदलापूरकरांवर 'पाणी' संकट
बदलापूरकरांवर आता 'पाणी' संकट

बदलापूर (ठाणे) : बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बॅरेज जलशुद्धीकरण प्रकल्पात कालच्या (22 जुलै) पुरामुळे उल्हास नदीचं पाणी घुसलं. त्यामुळे या प्रकल्पातील फिल्टरेशन प्लॅन्ट अजूनही पाण्याखाली आहे. त्यामुळे पुराच्या संकटानंतर आता बदलापूरकरांवर ‘पाणी’संकट ओढवलं आहे. बदलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रिटिशांनी 1923 साली बॅरेज धरण उभारलं होतं. या धरणातून तेव्हापासून बदलापूरसह आजूबाजूच्या शहरांना पाणीपुरवठा केला जात होता. कालांतरानं बारवी आणि अन्य धरणं उभारण्यात आल्यानंतर या धरणातून फक्त बदलापूर शहर आणि अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेट भागाला पाणीपुरवठा केला जाऊ लागला.

प्रकल्पाच्या वरच्या बाजूलाही कंबरभर पाणी

मुसळधार पावसामुळे गुरुवारी (22 जुलै) उल्हास नदीला पूर आला. या पुरात उल्हास नदीने 20.30 मीटरची पातळी गाठली होती. त्यामुळे बॅरेज धरणाच्या भिंतीवरून पाणी आत घुसण्यासाठी फक्त एक वीत अंतर शिल्लक होतं. मात्र तरीही बुधवारी मध्यरात्री खालच्या बाजूने जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी घुसलं. या पाण्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातील तिन्ही प्रक्रिया केंद्रात गढूळ पाणी शिरलं आणि प्रकल्प ठप्प झाला. तर प्रकल्पाच्या वरच्या बाजूलाही तब्बल कंबरभर पाणी जमा झालं. यामुळे प्रकल्पावर उपस्थित 17 कर्मचाऱ्यांनी नवीन इमारतीत उभारलेल्या प्रकल्पावर जाऊन आश्रय घेतला.

बोटीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं

याठिकाणी अक्षरशः चार दिवस पुरेल इतका अन्नपाण्याचा साठा, गॅस सिलेंडर हेदेखील नेऊन ठेवण्यात आलं होतं. अखेर गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास बोटींच्या साहाय्याने या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. यानंतर गुरुवारी संध्याकाळी उल्हास नदीची पाणीपातळी कमी आली असली, तरी बॅरेज जलशुद्धीकरण प्रकल्पातलं पाणी मात्र अजूनही कायम आहे. प्रकल्पाचे तिन्ही टप्पे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर हे गढूळ पाणी बाहेर काढून प्रकल्प कार्यान्वित करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरू आहेत.

मात्र या सगळ्यामुळे आधीच पुराचा फटका बसलेल्या बदलापूरकरांवर आता ‘पाणी’ संकट देखील ओढवलं आहे. आता जलशुद्धीकरण प्रकल्पाचं ‘शुद्धीकरण’ झाल्यानंतरच बदलापूरकरांचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकणार आहे.

बदलापूर शहरात आजवर आलेल्या पुरांमध्ये उल्हास नदीची पातळी

26 जुलै 2005 – 23.96 मीटर

27 जुलै 2019 – 20.00 मीटर

22 जुलै 2021 – 20.30 मीटर

बॅरेज धरणाच्या भिंतीची उंची – 20.42 मीटर

संबंधित बातम्या : 

Video : दूधसागर रेल्वे मार्गावर दरड कोसळली, रेल्वेच्या डब्यातही पाणी आणि चिखल, वाहतूक विस्कळीत

चिपळूण, कोकणातील पूरस्थिती आटोक्यात, दरडी कोसळल्यानं परिस्थिती गंभीर, कोयनेत पाण्याची विक्रमी आवक, जयंत पाटील यांची माहिती

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI