त्या रिपोर्टने धनंजय मुंंडेंचं टेन्शन वाढवलं, नवे आदेश काय?

मोठी बातमी समोर येत आहे,  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले होते, त्यावर आज महत्त्वाची सुनावणी लोकायुक्तांकडे पार पडली आहे.

त्या रिपोर्टने धनंजय मुंंडेंचं टेन्शन वाढवलं, नवे आदेश काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2025 | 5:12 PM

मोठी बातमी समोर येत आहे,  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले होते, त्यावर आज महत्त्वाची सुनावणी लोकायुक्तांकडे पार पडली आहे. ऑनलाईन सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया? 

आज अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडली आणि यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या गेल्या, असं म्हटलं गेलं की कृषी घोटाळ्या संदर्भातील ज्या पीआयएल होत्या, त्याचा संदर्भ देताना म्हटलं गेलं की, त्या पीआयएल मुंबई हाय कोर्टानं उडवल्या आहेत. पण त्यानंतर मी लोकायुक्तांना अतिशय गंभीर अशी माहिती दिली, ज्यामध्ये भ्रष्टाचार किती मोठ्याप्रमाणत झाला आहे, हे सांगितलं.

एवढंच नाही तर व्ही राधा ज्या कृषी विभागाच्या सेक्रेटरी होत्या, त्यांनी एक गंभीर रिपोर्ट सबमिट केला होता. तो रिपोर्ट त्यांनी तेव्हाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दिला, तो रिपोर्ट गायब आहे. याची जेव्हा मी माहिती दिली, तेव्हा लोकायुक्तांना अतिशय धक्का बसला. त्यांनी ते रिकन्फर्म केलं, तेव्हा त्यांना कळालं खरच हा रिपोर्ट गायब आहे. तेव्हा त्यांनी धनंजय मुंडे यांच्या वकिलाला सांगितलं आहे की या रिपोर्टची फाईल त्यांनी पुन्हा कृषी विभागाकडे द्यावी, आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे, असं यावर बोलताना दमानिया यांनी माहिती दिली, दरम्यान या रिपोर्टमुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात राज्यात काही मोठ्या घडामोडी घडू शकतात, त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात एकनाथ शिंदे यांचा भाव वाढू शकतो, असं दिसत असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. दमानिया यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.