
राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता मार्च महिना संपत आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस गेल्या आठ दिवसांपासून हजेरी लावत आहे. दुसरीकडे उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला. भारतीय हवामान विभागाने कोकणात दमट आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट जारी केला. शक्यतो दुपारी यादरम्यान घरातून बाहेर निघणे टाळा. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट कायम आहे. धाराशिव, लातूर, सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावेल. यादरम्यान विजांचा कडकडाट देखील असेल.
दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट दिला असून पारा 39 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 5 दरम्यान नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळावे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बीचे पिक पूर्णपणे गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्येच अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.
नांदेड जिल्ह्यात 16 ते 20 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 280 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यात 448 शेतकरी बाधित झाले आहेत, असा जिल्हा प्रशासनाने प्राथमिक अहवाल तयार केलाय. जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे आंबा, टरबूज, खरबूज, गहू,ज्वारी आणि काढून ठेवलेली हळद यासह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.
नांदेड आणि लातूरमध्ये सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस सुरू आहे. अवकाळीचे संकट या दोन जिल्ह्यांमधून काही जात नाहीये. मराठवाड्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही हवामान बदलाचा मोठा फटका बसताना दिसतोय. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी, कडाक्याची थंडी आणि गारपीट अशा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आंबा पिकावर गंभीर परिणाम झालाय. यामुळे आंब्याला अपेक्षित प्रमाणात तौर लागला नाही, आणि जो लागला त्याची मोठ्या प्रमाणात गळती झालीये.