विधान परिषदेच्या निवडणुकीचं चित्र अखेर स्पष्ट, कोण कोणाविरोधात लढणार? कुठे बंडखोरी?
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत. आज या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता निवडणुकांच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

संदीप जाधव, प्रतिनिधी : विधान परिषदेच्या पाच जांगासाठी निवडणुका होणार आहेत. यामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ या जागांचा समावेश आहे. दरम्यान आज या पाचही जांगासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ज्या -ज्या मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली होती, त्यातील काही जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, तर काही ठिकाणी बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.
पुणे शिक्षक मतदार संघ – पुणे शिक्षक मतदार संघात भाजपचे कौस्तुभ गावडे विरूद्ध काँग्रेसचे जयंत आसगावकर अशी प्रमुख लढत रंगणार आहे. मात्र दुसरीकडे सचिन सानप यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
पुणे पदवीधर मतदार संघ – पुण्याच्या पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्यामध्ये लढत असणार आहे. मात्र दुसरीकडे माजी आमदार दत्ता सावंत यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
नागपूर पदवीधर मतदार संघ- नागपूरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे विरूद्ध काँग्रेसचे अभिजीत वंजारी असा सामना रंगणार आहे. परंतु या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नितेश कराळे देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
अमरावती शिक्षक मतदार संघ – अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे, विरूद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून याच मतदारसंघामधून दत्तात्रय लहाने हे निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहयला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातून माजी आमदार श्रीकांत शिंदे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे असलेल्या शेखर भोयर यांनी देखील बंडखोरी केली आहे.
तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलिप घुगे असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रतापसिंह पाटील देखील ही निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.