…तर जशास तसे उत्तर देणार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. मात्र सरकारकडून मागण्या मान्य होत नसल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

...तर जशास तसे उत्तर देणार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
| Updated on: Sep 09, 2026 | 3:18 PM

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा 12 वा दिवस असून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांवर अत्यंत कडक शब्दांत तोफ डागली आहे. शासकीय बैठकीचा आणि सरकारमधील काही मंत्र्यांच्या भूमिकेचा समाचार घेताना, “मराठा आंदोलन मोडीत काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे,” असा थेट आरोप जरांगे यांनी केला आहे. तुम्ही सपशेल हरले आहात. तु्म्ही हार मानायला पाहीजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. जरांगे यांनी पुढे सांगितलं की, “मी कोणाचेही ऐकत नाही, पण केवळ लाड आणि सामंत यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी सलाईन घेतली होती, त्यांचा शब्द न् शब्द ऐकला होता. पण आता मराठा आंदोलन मोडीत काढण्यासाठी अंतर्गत कट कारस्थानं सुरू आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवत जरांगे पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना राज्यात दंगल घडवायची आहे आणि जर तसे झाले, तर त्याला सर्वस्वी तेच जबाबदार राहतील. तुम्ही सर्व आमदार आणि मंत्री एका बाजूला झालात, तरी आमचे काहीही वाकडं करू शकत नाही.

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरही जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. प्रताप सरनाईक मधेच आले आहेत. ते म्हणे एसटी भरून लोक आणणार आहेत? ते येणार पण नाहीत आणि आले तर मराठे असे गोटे मारतील की पळता भुई थोडी होईल. आम्ही आता तुमचे वस्ताद होणार आहोत. तुमच्या नेत्याला आम्ही आधी 3 वर्षे गोड बोलत होतो, ते का सांगत नाही? असाही प्रश्नही त्यांनी या निमित्ताने विचारला. आरक्षण संपवायला निघालात पण ते कधीच संपणार नाही, असंही जरांगे पाटील पुढे म्हणाले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी सरकारला अंतिम इशारा देत जरांगे पाटील म्हणाले की, 12 तारखेच्या आत प्रश्न सोडवा, नाहीतर मुंबईला जाणार म्हणजे जाणार! आमचा संयम सुटला की तुम्हाला आमची ताकद कळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us