Alka Yagnik: मी ठीक आहे..; 2 वर्षांनंतर बोलल्या अलका याज्ञिक, अवस्था पाहून चाहते भावूक
Alka Yagnik: अलका याज्ञिक गेल्या दोन वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतातून, सार्वजनिक कार्यक्रमांमधून दूर राहिल्या होत्या. आरोग्याच्या कठीण काळातून जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक गेल्या दोन वर्षांपासून प्रसिद्धी झोतापासून दूर आहेत. आपल्या सुमधूर आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अलका यांना एका दुर्मिळ आजाराचा सामना करावा लागत आहे. सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस या आजारामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. आता तब्बल दोन वर्षांनंतर त्या पुन्हा कॅमेऱ्यासमोर आल्या असून त्यांनी चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला. दोन वर्षांनंतर समोर आलेल्या अलका याग्निक यांची मुलाखत सध्या चर्चेत आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. चाहत्यांना आपल्या तब्येतीची चिंता असल्याचं त्यांना अनेक संदेशांमधून जाणवलं. यावर बोलताना त्यांनी ‘मी ठीक आहे’ असं सांगितलं. चाहत्यांसाठीच आपण कॅमेऱ्यासमोर आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या दोन वर्षांत अलका याग्निक यांनी लाइमलाइटपासून अंतर ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना पुन्हा स्क्रीनवर पाहणं चाहत्यांसाठी भावूक क्षण ठरला. मुलाखतीदरम्यान त्या पूर्वीपेक्षा काहीशा संथपणे बोलताना दिसल्या. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आणि त्यांना लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
अलका याज्ञिक यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 23 जून 2026 रोजी झालेल्या सन्मान सोहळ्यात त्या व्हीलचेअरवर दिसल्या होत्या. त्यावेळी त्यांना पाहून चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. पद्मभूषणबद्दल बोलताना अलका यांनी हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. सरकारकडून एखाद्या कलाकाराच्या कामाची दखल घेतली जाणं ही वेगळीच भावना असल्याचं त्यांनी म्हटलं. इतका मोठा पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षाही आपण कधी केली नव्हती, असं त्यांनी सांगितलं. मुलाखतीत अलका यांनी आपल्या आईचीही आठवण काढली. आपल्या मुलीमध्ये काहीतरी खास आहे आणि ती संगीत क्षेत्रात चांगलं काम करू शकते, असं त्यांच्या आईला वाटत होतं. आईच्या प्रोत्साहनामुळेच आपण गायनाच्या क्षेत्रात आल्याचं अलका यांनी सांगितलं.
अल्का याज्ञिक यांना सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस (SNHL) हा आजार झाला आहे. हा एक दुर्मिळ श्रवणदोष आहे. एका व्हायरल अटॅकनंतर अनपेक्षितपणे ही स्थिती उद्भवली असून त्यामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा कानाच्या आतील भागाला किंवा श्रवण चेतासंस्थेला इजा पोहोचते, तेव्हा मेंदूला आवाजांवर प्रक्रिया करणं कठीण होतं. यामुळे सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस होतो. हा दुर्मिळ आजार वयोमानामुळे, संसर्गामुळे, एखाद्या ट्रॉमामुळे किंवा व्हायरल अटॅकमुळे होतो.
