…तर त्यांचं मोठं नुकसान होईल, फडणवीसांनी नेमका कोणाला दिला इशारा? मराठा आंदोलनावर मोठं विधान

मराठा बांधवांचा मोर्चा आज मुंबईमध्ये धडकणार आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे, या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

...तर त्यांचं मोठं नुकसान होईल, फडणवीसांनी नेमका कोणाला दिला इशारा? मराठा आंदोलनावर मोठं विधान
Devendra Fadnavis
| Updated on: Aug 28, 2025 | 3:36 PM

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे अशी मराठा समाजाची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव एकवटले आहेत,  मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

आंदोलनासाठी जे नियम निकष केले आहेत, त्या नियमानुसार हे आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाहीये, आज आपल्याला माहिती आहे की, जवळपास साडेतीनशे जाती या ओबीसीमध्ये आहेत. आणि समजा आता आपण मेडिकलच्या प्रवेशाबाबत बघितलं तर ओबीसीचा कटऑफ हा एसीबीसीच्यावर आहे. एसीईबीसीचा कट ऑफ हा इडब्ल्यूएसच्यावर आहे, त्यामुळे या मागणीमुळे नेमकं किती भलं होणार आहे, याची मला कल्पना नाही. आपण जर आकडेवारी नीट बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे, हे आपल्या लक्षात येईल असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की मराठा समाजाची देखील ही जबाबदारी आहे की, त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. मात्र एक गोष्ट खरी आहे, की एसीईबीसी आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही, राजकीय आरक्षण हा जर हेतू असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे. जर राजकीय आरक्षण हा हेतू नसेल आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची जर लढाईल असेल, नोकरी मिळाली पाहिजे, प्रवेश मिळाला पाहिजे तर मात्र या मागणीचा विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की यापूर्वी काय झालं हे तुम्ही सर्वांनी बघितलं आहे, आजही आंदोलनासाठी रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत? हे पाहायला मिळत आहे, पण ठीक आहे. माझं म्हणणं काय आहे, की आमच्यासाठी हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू, काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार नाही, असा इशाराही विरोधकांना यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.

मराठा, ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे, ते कोर्टातही टिकलं आहे. कोणाचंही आरक्षण काढून घेणार नाही, लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ नये. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.