चंद्रपूर हादरलं! तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला, 4 जागीच ठार; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

चंद्रपुरातील सिंदेवाहीत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघाने हल्ला केला असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर हादरलं! तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला, 4 जागीच ठार; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
वाघ (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2026 | 11:08 AM

चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात एका वाघाने 13 महिलांवर हल्ल्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या 13 महिला एकत्र जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक वाघाने महिलांवर हल्ला केला. हल्ला होताच घाबरलेल्या महिला आपले प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटल्या. जिवाच्या आकांताने त्यांनी मदतीसाठी हाकही मारली, परंतु जंगलात त्यांना कोणतीच मदत मिळणं कठीण होतं. वाघाने काही महिलांवर आक्रमकपणे झडप मारली आणि या हल्ल्यात चार जणींना आपला जीव गमावला. महिलांना बचावाची कोणतीच संधी न देता वाघान सलग हल्ले केले, त्यातच चौघींचा मृत्यू झाल्याची माहिती, प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. कवडूबाई दादाजी मोहुर्ले, अनुबाई दादाजी मोहुर्ले, सुनिता कौशिक मोहुर्ले आणि संगीता संतोष चौधरी अशी मृत पावलेल्या महिलांची नावं आहेत.

13 महिलांवर वाघाचा हल्ला

वाघानेने हल्ला करताच 13 पैकी एक महिला धावत ओरडत गावात आली. मदतीसाठी तिने आरडाओरड करून गावकऱ्यांना गोळा केलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. महिलांच्या मदतीसाठी काही गावकरी तिच्यासोबत धावत जंगलात गेले असता चार महिलांचे मृतदेह त्यांना आढळून आले. हल्ल्यानंतर वाघ घनदाट जंगलात धावून गेली. तर इतर महिला सुखरुप असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबद्दलची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभाग याचा तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाचे अधिकारी वाघाचा शोध घेतल आहे.

जिल्ह्यातील दुसरी मोठी घटना

काही महिन्यांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातीलच एका जंगलात वाघाने तीन महिलांचा बळी घेतला होता. त्यानंतर घडलेली ही दुसरी मोठी घटना आहे. तर गेल्या पाच महिन्यात या जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावकऱ्यांकडून वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत महिलांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी आणि जंगलात जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात ग्रामीण भागातील महिला आणि पुरुष जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी जातात. सुरक्षेसाठी काही महिला घोळका करून जंगलात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जातात. मात्र तरीही त्यांच्यावर वाघांच्या हल्ल्यांची भीती कायम असते. अशा वेळी वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Follow Us