
देशामध्ये सक्रिय असलेल्या माओवादी नक्षलवादी संघटनेसाठी आजचा दिवस सर्वात मोठा पराभव घेऊन आला आहे. देशातील सर्वात खतरनाक आणि १ कोटी रुपयांचे इनाम असलेला माओवादी म्होरक्या सेंट्रल कमिटी मेंबर रामधेर मज्जी याने आपल्या ११ उच्च कमांडरांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. छत्तीसगडमधील खैरागढ़ जिल्ह्यातील बाकरकट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुमही गावात त्यांनी आत्मसमर्पण केले. यामुळे मध्यप्रदेश-महाराष्ट्र-छत्तीसगड (MMC) झोन अधिकृतपणे नक्षलमुक्त झाल्याचे मानले जात आहे.
रामधेर मज्जी आणि त्याच्या गटाने छत्तीसगडमधील खैरागढ़ जिल्ह्यातील बाकरकट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुमही गावात पोलिसांपुढे शरणागती पत्करली. रामधेरने त्याचे AK–47 हे रायफल पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यासोबत DVCM आणि ACM स्तराचे विभाग आणि क्षेत्र समिती सदस्याचे दहशतवादी चंदू उसेंडी, ललिता, जानकी, प्रेम, रामसिंह दादा, सुकैश पोट्टम यांनीही आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये सहा महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या आत्मसमर्पणावेळी त्यांच्याकडून AK-47, INSAS, SLR, .303 आणि .30 कार्बाइन यांसारख्या घातक शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
रामधेरच्या आत्मसमर्पणाने मध्यप्रदेशच्या पोलिसांना दोन दिवसांत मोठे आणि ऐतिहासिक यश मिळाले आहे. रामधेरच्या आत्मसमर्पणाच्या केवळ २४ तास आधी रविवारी ७ डिसेंबर रोजी बालाघाट येथे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत MMC झोनच्या कान्हा-भोरा देव (KB) डिव्हिजन मधील १० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होता. या १० जणांवर एकूण २.३६ कोटी रुपयांचे इनाम होते. यात सुरेंद्र ऊर्फ कबीर सोडी याच्यासह चार महिला नक्षलवादी सामील होत्या. यातील सुरेंद्र ऊर्फ कबीर सोडी यांच्यावर ६२ लाखांचे इनाम होते. या दोन दिवसांतील आत्मसमर्पणामुळे मध्य प्रदेश आता पूर्णपणे सशस्त्र नक्षलवादी कारवायांतून मुक्त झाल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या यशाचे श्रेय मध्यप्रदेश पोलिसांच्या ऑपरेशन: सरेंडर करो या समाप्त हो जाओ या कठोर धोरणाला दिले आहे. डिंडौरी आणि मंडला जिल्हे आधीच नक्षलमुक्त होते, आता बालाघाटही मोठ्या प्रमाणात नक्षलमुक्त होत आहे. या वर्षात आतापर्यंत मध्यप्रदेश पोलिसांनी विशिष्ट लक्ष्य साधून केलेल्या कारवाईत १० नक्षलवाद्यांना एन्काऊंटरमध्ये ठार केले आहे, ज्यांच्यावर एकूण १.८६ कोटी रुपयांचे इनाम होते. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात अनंत ऊर्फ विकास नागपुरे याच्या नेतृत्वाखालील ११ जणांनी आत्मसमर्पण केले होते. यामुळे रामधेरचे नेटवर्क पूर्णपणे तुटले होते.
या संपूर्ण क्षेत्राचा आता नक्षलमुक्त झाल्यामुळे कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगढ व्याघ्र प्रकल्प आणि संपूर्ण जंगल कॉरिडॉरची सुरक्षा लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे. तसेच यापुढे वन्यजीव आणि वन कर्मचाऱ्यांसाठी हे क्षेत्र अधिक सुरक्षित होईल, असे म्हटले जात आहे.