
नशिबापुढे कोणाचं काहीही चालत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. पण महाराष्ट्रातील टिटवाळा परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या ठिकाणी असलेल्या काळू नदीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला. या दोघीही कपडे धुण्यासाठी नदीकिनारी गेल्या होत्या. मात्र काही क्षणात या दोन निरागस बहिणींना काळाने हिरावून घेतले. ही घटना कल्याण तालुक्यातील मांडा पश्चिमेतील वासुद्री रोड परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी कल्याणजवळील टिटवाळा परिसरात काळू नदीच्या काठावर गणेश नगरात राहणाऱ्या दोन बहिणी या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. १८ वर्षीय रिया अन्सारी आणि तिची ९ वर्षांची धाकटी बहीण सिना अन्सारी या दोघीही दुपारच्या वेळी नदीत कपडे धुवत होत्या. यावेळी त्या दोघीही एकमेकींसोबत गप्पा मारत होत्या. यावेळी एकीने त्यांच्या मोबाईलमध्ये कपडे धुतानाचा एक व्हिडीओही रेकॉर्ड केला. पण हा व्हिडीओ त्यांच्या आयुष्यातील शेवटचा व्हिडीओ असेल, याची कल्पनाही त्यांना नसावी. यानंतर काही क्षणातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
रिया आणि सिना कपडे धुवत असताना अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान झाला की त्या दोघींनाही पाण्याचा अंदाज आला नाही. यानंतर क्षणातच, पाण्याचा लोंढा त्यांना खोल पाण्यात घेऊन गेला. त्या दोघी बहिणी डोळ्यादेखत बुडाल्या. त्यावेळी मदतीसाठी कोणीही जवळ नव्हते. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस आणि केडीएमसी अग्निशमन दलाच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी जयेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम सुरू करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर, दोन तासांनी १८ वर्षीय रियाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, सिनाचा शोध सलग २८ तास सुरू होता. अखेर, तिचा मृतदेह कल्याण गांधारी खाडी परिसरात पाण्यावर तरंगताना आढळला.
दरम्यान ज्या नदीकिनारी त्या हसत-खेळत गेल्या होत्या, त्याच नदीने त्यांना कायमचे हिरावून घेतले. यामुळे अन्सारी कुटुंबात आक्रोश आणि दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दोन बहिणींचा कपडे धुतानाचा एक व्हिडिओ आता फक्त आठवण म्हणून उरला आहे. ज्यामुळे कुटुंबाला अश्रू अनावर होत आहे. या घटनेने संपूर्ण टिटवाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.