
राज्यातच नव्हे तर देशात मराठवाड्याची नेहमीच वेगळी ओळख राहिली आहे. देशाच्या हरितक्रांतीनंतर राज्यातल्या कृषी क्रांतीत मराठवाड्याचे एक मानाचे स्थान आहे. धान्य उत्पादनातल्या विक्रमाबरोबर कापूस आणि उसाच्या उत्पादनात या भागाने आपले वेगळेपण राज्यात सिद्ध केले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ मराठवाड्यात सिंचनाच्या सुविधा समाधानकारक आहेत. परिणामी मराठवाड्याने कापूस, साखर, फळे, भाजीपाला, दूध आणि विशेषत: कडधान्ये आणि तेलबिया उत्पादनात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
रोजगारासाठी मराठवाड्याची सर्वाधिक मदार ही शेतीवरच आहे. अशात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूरचे वाढते शहरीकरण तर जालना पट्ट्यातल्या वाढत्या औद्योगिकरणामुळे मराठवाड्यातली शेतमालाची बाजारपेठही विस्तारू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले वाढते पर्यटन आणि औद्योगिक विस्तार यामुळेही शेतीच्या विकासाला चालना मिळू लागली आहे. पण इथे खरी कृषीक्रांती आणली ते गेल्या दशकातल्या नागपूरहून मुंबईला गेलेल्या समृद्धी महामार्गाने. हा महामार्ग झाल्यापासून एका दिवसाच्या अंतरावर असलेली मायापुरी मुंबई अवघ्या काही तासांच्या अंतरावर आली आहे. त्यामुळे मुंबईची भली मोठी अन्नधान्याची, फळा-फुलांची, दुधाची बाजारपेठ मराठवाड्यासाठी खुली झाली आहे.
या महामार्गामुळे मराठवाड्यातला शेतमाल आता मुंबईत काही तासात पोहचतोय. नगदी पिकांमुळे मराठवाड्याच्या अर्थकारणाला तादक मिळण्यास सर्वात मोठी मदत मिळाली आहे. याचा फायदा तरुण पिढीतल्या शेतकऱ्यांना आणि शेतीपूरक उद्योग करणाऱ्या कृषी व्यवसायिकांना होऊ लागला आहे. मुंबई-ठाण्यात मागणी असलणाऱ्या फळं-भाज्या, दूध यावर प्रक्रिया करणारे अनेक व्यवसाय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड भागात उभे राहू लागले आहेत.
शहरांना लागणारी अन्नधान्याची गरज भागवणारी शेती पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यात जास्त प्रमाणात आहे. आता मराठवाडासुद्धा हरितक्रांती आणि बाजार कनेक्टिव्हिटीचा लाभ घेऊन आपली कृषकोन्नती साधण्यासाठी मागे राहणार नाही. याच निमीत्ताने टीव्ही9 मराठी वृत्तवाहिनीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत 18 सप्टेबर रोजी ‘महाराष्ट्राचा महासंकल्प, शेतीतून समृद्धीकडे’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमासाठी राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांना उद्घाटन मार्गदर्शनासाठी निमंत्रीत केले आहे. त्याचबरोबर राज्याचे दुग्धविकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह फलोत्पादन आणि रोहयोमंत्री भरत गोगावले हे देखील तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात विजय अण्णा बोराडे खास मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांसह अनेक मान्यवर, कंपन्यांचे प्रतिनिधी कृषी पदविकेचे विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गुरूवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हयात प्लेस येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.