
दिल्लीच्या दयालपूर भागात डी ब्लॉकमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मुलीवर बलात्कार झाल्याची शंका निर्माण होत आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची 6 पथकं देखील रवाना झली आहेत. तर पुणे येथे महसूल पाठोपाठ पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर असल्याची माहिती समोर येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गेल्या पाच महिन्यात केलेल्या कारवाईतून माहिती समोर आली आहे. भ्रष्टाचारात पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानी महसूल विभाग तर दुसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग असल्याचं समोर आलं आहे. जालन्यातील अंबड शहरालगत असलेल्या तलावामध्ये मृत माशांचा खच आढळून आला आहे. मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने मच्छी व्यवसायिकांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. माशांचा मृत्यू काशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठ जलमय झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने अनेक दुकाने आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली. पावसामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून, काही ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव शहराजवळ वाके फाटा येथे बस आणि मालट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 16 ते 17 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे आणि संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बस आणि मालट्रॅक यांची समोरासमोर धडक झाल्याचे समजते. जखमींना तत्काळ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर आली आहे.
पांडुरंगाच्या मनात आलं तर सुप्रिया ताई आणि अजितदादा एकत्र येतील असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की ” हा पक्षाचा निर्णय आहे. जो काही निर्णय पक्षाचा असेल त्याबद्दल कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल.”
आज पासून बच्चू कडू अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. शेतकरी, अपंग,शिक्षक, दिव्यांग,शेतमजूर,मच्छिमार यांच्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. बच्चू कडू यांचे मूळ गाव असलेल्या बेलोरा येथून बाईक रॅलीला सुरुवात केली. तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीपर्यंत बाईक रॅलीही काढली.बाईक रॅलीत हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले.
अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये ओमनी कारचा अपघात झाला आहे. मजुरांना घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात झालाय. या अपघातात 9 मजूर जखमी झाले आहेत. तर 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
देशात कोरोना वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्राच 86 नवीन सक्रीय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
मदर डेअरीच्या जागेत गार्डन व्हावं , झाडांचं संरक्षण व्हावं यासाठी आम्ही सगळ्यात आधी आंदोलन केलं होतं. आज जे कुर्ला येथे आंदोलन करीत आहेत ते धारावीत ४ टर्म आमदार होते, धारावीचा त्यांना विकास करता आला नाही. धारावीचा प्लान काँग्रेसने केला होता. पण आमच्या सरकारने काम केल्याचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांची पोकळी जर कोणी भरून काढली असेल ती आहेत एकनाथ शिंदे यांनी असे शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद यांनी म्हटले आहे.
पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांचे मृतदेह सहा तासाच्या शोध मोहिमेनंतर अखेर पोलिसांनी नदीच्या पात्रातून बाहेर काढले. ही घटना तेलंगाना राज्यात होती. जिथे काल सायंकाळच्या वेळी आठ युवक अंघोळ करण्यासाठी गोदावरी नदीत गेले होते. त्यातून सहा युवक पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे पाण्यात वाहून बेपत्ता झाले होते. काल (8 जून 2025) रात्री मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी शोध मोहीम घेतला होता. त्यानंतर सकाळपासून तेलंगणा राज्यातील भोपालपल्ली जिल्हा प्रशासनाने शोध मोहिमेसाठी मोठे पथक रवाना केले होते. अखेर साडेबारा वाजता सहा युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू आहेत. राऊत आणि अनिल परब यांच्यावर जबाबदारी आहे. दोन्ही बंधू एकत्र येतात म्हणून अजित पवार सुप्रिया सुळे एकत्र येण्यासाठी उत्सुक आहेत.”
दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये, राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांना निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी घडली. स्थानिक माध्यमांनुसार, उरीबे यांना तीन गोळ्या घालण्यात आल्या, त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली. उरीबे राजधानी बोगोटा येथे एका रॅलीला संबोधित करत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून 15 वर्षीय आरोपी हल्लेखोराला अटक केली आहे.
आज पासून बच्चू कडू अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. शेतकरी, अपंग, शिक्षक, दिव्यांग, शेतमजूर, मच्छिमार यांच्यासाठी आंदोलन करणार आहेत.
राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करतात. सातत्याने जनादेशाचा अपमान करतात. जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार, असे फटकारे मु्ख्यमंत्री फडणवीस यांनी लेखातून लगावले.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार आहे. 32 वर्षानंतर साताऱ्यात साहित्य संमेलन होणार आहे. सातारामधील हे 4 थे साहित्य संमेलन आहे. साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे 99 वे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
जळगाव च्या पारोळा तालुक्यातील विचेखडेजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. कारचालकाला अटक न केल्याने संतप्त नातेवाइकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणले. पारोळा पोलीस स्टेशन येथे अपघातात मयत तरुणांचे मृतदेह आणून संतप्त नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केलं
मराठी माणूस इकडचा मूळ आहे परप्रांतीयांच्या खाली दाबला जातोय, असे जर मनोमिलन झाले तर आशादायी वातावरण होईल असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. नातेवाईकांचे मला माहीत नाही. उद्धव ठाकरे सकारात्मतक आहे. आपण सकारात्मक राहूयात, असे पेडणेकर म्हणाल्या.
राहुल गांधी खोटं बोलतात असे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. काल गांधींनी महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंग होणार असल्याचा दावा केला होता. त्याला फडणवीस यांनी लेख लिहून उत्तर दिले.
पुण्यात आज अखिल भारतीय साहित्य संमेलनाची महत्वाची बैठक सुरू आहे. 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीची महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यालयात सदस्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत यंदाच्या साहित्य संमेलनाचे नियोजन ही करण्यात येणार आहे. मराठ्यांची राजधानी अशी ओळख असणाऱ्या राजधानी सातारा येथे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेकडून निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र आज साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर समिती संमेलन स्थळाची घोषणा करणार आहे
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राहुल गांधींनी तसं लिहिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्तमानपत्रात एक मोठा लेख लिहिला. एका मजबूत लोकशाहीत, प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. राहुल गांधींनी ते लिहिलं कारण त्यांना आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून सर्व पत्रांचं उत्तर मिळालेलं नाही.”
हिंजवडी आयटी पार्कमधील पाणी साचण्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दर दोन महिन्यांनी मी हिंजवडीचा विकास आढावा घेते. शरद पवार यांनी हिंजवडी सुरू केली आणि आज तिथे ६ लाख लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोजगार आहे. गेल्या दोन वर्षांत तिथे झालेल्या सर्व विकासामुळे मोकळे भाग बंद झाले आहेत आणि पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे. नाल्यांवर इमारती बांधल्या गेल्या आहेत आणि गेल्या २ वर्षांपासून आम्ही याबद्दल सरकारशी लढत आहोत..”
चंद्रपूर : पिकअप चालकाने टोल नाका कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली. बल्लारपूर शहराजवळील टोल नाक्यावरील आज पहाटेची घटना आहे. संजय वांढरे हा टोलनाका कर्मचारी गंभीर जखमी झाला. संजय वांढरे हा बल्लारपूर शहरातील गांधीवाढ परिसरातील रहिवासी आहे.
“बारामती, इंदापूर आणि दौंड या भागात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पंचनामे झाले आहेत. मी परदेशात असले तरी वेळोवेळी लोकांशी आणि प्रशासन यांच्या संपर्कात होते. सरकारने या भागातील लोकांना सरसकट कर्ज माफ करावं,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत आधुनिक पर्यटन मार्केट उभारण्यात येणार आहे. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले.
शरद पवार पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी दाखल झाले आहे. थोड्या वेळात ते बारामतीसाठी निघणार आहेत. जाताना मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे जाणार आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर व परीसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर व परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांवर बंदीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. धुम्रपान करणाऱ्या भाविकांना देखील मंदिरात जाण्यापासून रोखले जाणार आहे.
नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 40 टक्क्यापेक्षा जास्त आवक घटली आहे.
खासदार सुप्रिया सुळे आज बारामती, इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर आहेत. बारामती नगर परिषदेच्या समोर पथविक्रेत्यांनी होत असलेल्या कारवाई विरोधात भारतीय युवा पँथर संघटना यांचे लाक्षणिक उपोषण सुरू केलेले केले आहे. त्यांची भेट सुळे घेणार आहेत.
तेलंगाना गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी दोन मुलांचे मृतदेह शोध मोहीम पथकाने बाहेर काढले आहेत. सहा मुलं पाण्यात बेपत्ता झाली होती. सकाळी सात वाजेपासून शोध मोहीम पुन्हा राबविण्यात आली. रात्रीही मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी शोध मोहीम केली होती परंतु त्यांच्या हाती काहीच लागला नाही. सकाळी आता साडेआठ वाजता दोन मुलांचे शव -शोध मोहीम पथकाच्या हाती लागले.
मुंबईमध्ये मासे महागले आहेत, श्रावण महिन्याच्या सुरुवातीला मासेमारी बंद असल्यामुळे मासे महागले आहेत. सुरमई आधी 1000 रुपये किलो होती ती आत्ता १६०० रुपये किलो तर पापलेट १२०० रुपये किलोने मिळायची ती १८०० रुपये किलो… झिंगे जे आधी ४०० रुपये होते ते आत्ता ५०० रुपये झालेत, जिंताडा आधी ७०० रुपये किलो होता तो आत्ता १००० रुपये किलो झालाय…
वेगवेगळ्या लग्न समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या पुतणीच्या लग्नाला देखील एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. इतरही काही लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत.
शिंदे गटाचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अविनाश थोडी याला दादरा नगर हवेली येथील सेलवास येथून नातेवाईकांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. पहाटे साडेतीनच्या दरम्यान सेलवास येथून गुन्हे शाखेने अविनाश रमण धोडी याला अटक केली आहे. गेल्या पाच महिन्यापासून अविनाश रमण थोडी हा मुख्य सूत्रधार आरोपी अपर्णाने हत्या केल्यानंतर फरार होता.