Maharashtra News Live : धाराशिव : महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये दाखल झाले असून त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

Maharashtra News Live : धाराशिव : महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
Maharashatra News Live
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Dec 16, 2025 | 9:02 PM

महापालिका निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 तारखेला होईल. सध्या प्रशासकांच्या हाती असलेला कारभार पुन्हा लोकप्रतिनिधींकडे येईल. मुंबई, नागपूर, पुण्यात चार वर्षांनंतर तर कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नवी मुंबई आदि महापालिकांमध्ये सहा वर्षांनंतर निवडणुका होणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे सर्वांचं लक्ष आहे. तर काँग्रेसकडे आता मुंबईत फारसं काही राहिलं नाही, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली काय, नाही लढवली काय फारसा फरक पडत नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. मुंबई महानगरपालिका स्वतंत्र लढणार असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं होतं. नांदेड महानगरपालिकेला युतीसंदर्भात पक्षश्रेष्ठी जे निर्देश देतील त्यानुसार निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Dec 2025 07:55 PM (IST)

    पुणे : शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

     

    पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी शीतल तेजवानीला आज बावधन पोलिसांनी जेलमधून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला पौंड न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तिला 8 दिवसांची म्हणजे 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात तिची चौकशी केली जाणार आहे.

  • 16 Dec 2025 07:42 PM (IST)

    जळगाव : ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक फिस्कटली

    जळगावात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक फिस्कटली आहे. सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं शरद पवार गटाचे पदाधीकारी बैठकीतून बाहेर पडल्याचे पहायला मिळाले. युतीची चर्चा फिस्कटल्याने शरद पवार गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. शरद पवार गटाचे महानगराध्यक्ष संग्राम सिंह राजपूत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

     

  • 16 Dec 2025 07:28 PM (IST)

    धाराशिव : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

    नगरपालिका निवडणूक निकालापूर्वी तुळजापुरात भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. याप्रकरणी एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे तुळजापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकाला आधीच दोन पक्षांचे कार्यकर्ते भिडल्याने तुळजापूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

     

  • 16 Dec 2025 07:17 PM (IST)

    चंद्रपूर : सावकाराच्या तगाद्यामुळे किडनी विकली, सहा जणांवर गुन्हा दाखल

    चंद्रपूरमधून सावकाराच्या तगाद्यामुळे किडनी विकल्याचे प्रकरण समोर आले होते. आता याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन कुडे याला दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात मोठी रक्कम उकळण्यात आल्याचं देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 16 Dec 2025 06:49 PM (IST)

    जळगावातील भडगावात दोन बालकांच्या मृत्यूनंतर रास्ता रोको

    जळगावातील भडगावात शहरात शाळेच्या परिसरालगत नाल्यात बुडून दोन चार वर्षीय विद्यार्थ्यांचा सकाळी मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको सुरु केला आहे. पोलिस आंदोलन करणाऱ्या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

     

  • 16 Dec 2025 06:36 PM (IST)

    अंबरनाथ येथे उद्या मुख्यमत्र्यांची जाहीर सभा

    अंबरनाथ पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या अंबरनाथ येथील गावदेवी मंदिरात जाहीर सभा होत आहे. भाजप नगराध्यक्ष सीए तेजश्री करंजुले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची अंबरनाथमध्ये सभा होत आहे.

  • 16 Dec 2025 06:25 PM (IST)

    तपोवनला लागून असलेल्या जागेत वृक्षारोपण होणार – महाजन

    वृक्षरोपणासाठी सहा ते सात एकर जागा तपोवनला लागून आहे. कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाणार आहे असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. आम्ही यांचे वृक्ष संगोपन करणार आहोत. आमची हजार झाडे या ठिकाणी दोन्ही ट्रक भरुन येथे येतील दोन दिवसात सगळी झाडे आम्ही येथे लावू असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. हैदराबाद राजमुद्रेवरून गाड्या निघाल्या आहेत. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. मेंटेनन्स देखील करणार आहे असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

  • 16 Dec 2025 06:13 PM (IST)

    वाल्मिक कराड याच्या जामिनावरील सुनावणी तहकुब

    वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी चालवणारा व्यक्ती आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला जामीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकीलांनी त्याचा जामीनाला विरोध करताना केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सरकारी वकिलांनी आज कोर्टासमोर मांडला. आजची सुनावणी संपली असू उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

  • 16 Dec 2025 05:54 PM (IST)

    बंजारा आणि धनगर समाज बांधवांकडून खोतकर आणि लोणीकरांचा सत्कार

    बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी जालन्यात मागच्या काही महिन्यांपूर्वी बंजारा आणि धनगर समाज बांधवांकडून उपोषण आणि आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर जालना शहरात मोठ्या संख्येने विराट मोर्चे देखील निघाले होते.यावेळी लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा आपण सभागृहात मांडू असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं होतं. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवळी अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये बंजारा आणि धनगर आरक्षणाचे प्रश्न मांडल्यामुळे आमदार अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकारांचा सत्कार करण्यात आला.

  • 16 Dec 2025 05:43 PM (IST)

    गिरीश महाजन नाशिकच्या हिरावाडी परिसरात करत आहेत वृक्षांसाठी पाहणी

    -मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या हिरावाडी वृक्षांसाठी पाहणी परिसरात करत आहेत. सामाजिक दायित्वातून वृक्ष लागवडीसाठी अनेक शैक्षणिक संस्था पुढे आल्या आहेत.  नाशिकच्या हिरावाडी परिसरात आता 2 हजार वृक्ष लावली जाणार आहेत. शैक्षणिक संस्थाकडून वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.

  • 16 Dec 2025 05:35 PM (IST)

    भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला

    भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते नितीश कुमार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री होते.

  • 16 Dec 2025 05:35 PM (IST)

    मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन

    प्रसिद्ध अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्याशी संबंधित कार्यक्रमादरम्यान साल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या तोडफोडीच्या चौकशीसाठी चार सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

  • 16 Dec 2025 05:05 PM (IST)

    मनरेगा मुद्द्यावर काँग्रेस 28 डिसेंबर रोजी देशव्यापी निदर्शने करणार

    मनरेगाच्या नामांतराच्या विरोधात काँग्रेस 28 डिसेंबर रोजी देशव्यापी निदर्शने करणार आहे. काँग्रेस स्थापना दिनी गावागावात आणि जिल्ह्यांमध्ये गांधीजींच्या फोटोसह निदर्शने केली जातील. काँग्रेस खासदारांनी आज मकर द्वार येथेही जोरदार निदर्शने केली.

  • 16 Dec 2025 02:55 PM (IST)

    मी या सरकारचा धिक्कार करतो- आमदार सत्यजीत तांबे

    आमच्या तालुक्यांमध्ये रोज रेल्वेचा भोंगा वाजला पाहिजे, ही अपेक्षा. आजतागायत 100 एकरपेक्षा जास्त जमिनीचे भूसंपादन झाले. मात्र रेल्वेचा मार्ग बदलला. रेल्वे शिर्डीमार्गे नेणे म्हणजे पुण्याहून पुणतांबा. मी या सरकारचा धिक्कार करतो. सार्वजनिक प्रकल्प करताना नफा तोटा बघायला नसतो, तर लोकांचा विचार करायचा असतो असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले.

  • 16 Dec 2025 02:40 PM (IST)

    काँग्रेसचे माजी महापौर, उपमहापौर व मनसे जिल्हाध्यक्ष भाजपात

    नांदेड येथील काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख व विनोद पावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.

  • 16 Dec 2025 02:30 PM (IST)

    गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

    गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसापासून रस्त्यावरच असल्यामुळे शेतकरी मोठे चिंतेत आहेत. कापणी होऊन 25 दिवस लोटले तरी जिल्ह्यात कुठेही धान खरेदी केंद्र सुरू नाही . धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात अधिवेशनात मुद्दा गाजल्यानंतरही गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के धान खरेदी केंद्र बंद

  • 16 Dec 2025 02:15 PM (IST)

    धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

    आचारसंहिता लागू होताच धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. देवभाने शिवारात बनावट दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. महिन्याभरापासून सुरू असलेला कारखाना अखेर बंद करण्यात आला.

  • 16 Dec 2025 01:54 PM (IST)

    येवल्यात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी आक्रमक; दिवसा वीज मिळावी म्हणून महावितरणवर आक्रोश मोर्चा

    येवला तालुक्यात बिबट्यांचा वाढलेला वावर आणि रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे शेतकरी आणि राजकीय पक्ष दिवसा शेतीसाठी वीज मिळावी या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षांच्यावतीने एकत्रितपणे महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी विंचूर चौफुली ते महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा काढत महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. येत्या पाच दिवसांत जर दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी महावितरणला दिला. तसेच मोर्चाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  • 16 Dec 2025 01:40 PM (IST)

    महापौर भाजपचा की महायुतीचा, अंबादास दानवेंचा बावनकुळेंना सवाल

    अंबादास दानवे यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. बावनकुळे हे मुंबईचा महापौर भाजपचा होईल की महायुतीचा, हे स्पष्ट बोलत नाहीत. महापौर भाजपचा होणार आहे की महायुतीचा त्यांनी तसं सांगावं. एकीकडे शिंदे गटाला त्रास द्यायचा आणि त्यांचेच लोक फोडायचे, हा प्रकार म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे आहे. गळ्यात गळा घालायचा आणि गुपचूप पाठीत खंजीर खुपसायचा आणि हे काम भाजपा करत आहे, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.

  • 16 Dec 2025 01:27 PM (IST)

    येत्या दोन दिवसात…; मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर अंबादास दानवेंचा मोठा दावा

    अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता बळावली आहे. युती होणार असा पूर्णपणे निर्णय झालेला आहे. संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत आणि यासाठी फार दिवस मोजावे लागणार नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होऊ शकते आणि हे दोन-चार दिवसांत होईल, अस अंबादास दानवे म्हणाले

  • 16 Dec 2025 01:16 PM (IST)

    महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच मनसेचा शिवाजी पार्कसाठी अर्ज

    महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२ जानेवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आपली शेवटची सभा आयोजित करण्यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला रीतसर पत्र देण्यात आले आहे.

  • 16 Dec 2025 01:08 PM (IST)

    बेपत्ता शाळकरी मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला, चाळीसगावच्या तरवाडे गावात तणाव

    चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री शिंदेचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी गावाजवळील विहिरीत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शाळेतून घरी परतताना धनश्री बेपत्ता झाली होती. या घटनेची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शवविच्छेदन झाल्यानंतरच धनश्रीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

  • 16 Dec 2025 12:59 PM (IST)

    सावकारी फासातून बळीराजाची सुटका नाहीच

    कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला लावली किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. चंद्रपूरातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे.कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली.
    या क्रूर प्रकाराणे महाराष्ट्र हादरला आहे.जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला. बळीराजाचा वेदना बघून दगडालाही पाझर फुटेल.मात्र सरकार, प्रशासनाला बळीराजाचे आभाळाएवढे दुःख कधी दिसलेच नाही. चंद्रपूर जिल्हातील या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना आभाळाला भिडणारी आहे.सावकारी कर्जाचा जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादाई प्रसंग ओढवीला. या शेतकऱ्याचे नाव आहे रोशन सदाशिव कुडे. ते चंद्रपूर जिल्हातील मिंथुर गावातील रहिवाशी आहे.

  • 16 Dec 2025 12:50 PM (IST)

    महापालिकेसाठी भाजप लागली कामाला

    नागपूर महानगर पालिका निवडणुका जाहीर होताच भाजप कामाला लागली आहे. आजपासून भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. 1489 इच्छुक उमेदवारांचे भाजपकडे उमेदवारी अर्ज आले आहेत. त्या आधारावर मुलाखती घेतल्या जात आहे. सगळ्याच जागांसाठी मुलाखती घेतल्या जात आहेत. एका प्रभागात जवळपास 9 ते 10 इच्छुक उमेदवार मात्र उमेदवारांची क्षमता बघून उमेदवारी दिली जाणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष दया शंकर तिवारी यांनी सांगितले.

  • 16 Dec 2025 12:40 PM (IST)

    अमरावती महापालिकेत भाजप,शिवसेना आणि युवा स्वाभिमानी यांच्यात युती

    अमरावती महानगरपालिकेत भाजप,शिवसेना आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचीच युती होणार. अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्या महायुतीमध्ये राहणार नाही असा दावा रवी राणा यांनी केला आहे. आमच्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होतो मात्र राष्ट्रवादीचा आम्हाला काही फायदा होणार नाही त्यामुळे ते महायुतीत नको अशी भूमिका रवी राणांनी जाहीर केली. मंत्री बावनकुळे यांनी सूचना दिले आहे की भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानच्या तीन पक्षांनी एकत्र बसून जागा वाटपाबाबत चर्चा करावी अशी माहिती त्यांनी दिली.

  • 16 Dec 2025 12:29 PM (IST)

    आज भाजप-शिवसेनेची बोलणी-संजय शिरसाट

    आज दुपारी साडेबारा वाजता शिवसेना आणि भाजपची बोलणी होईल. संयुक्त बैठक भाजप कार्यालयात होणार. आमच्या आणि त्यांच्या मागण्या मॅच झाल्या पाहिजे हा आमचा प्रयत्न. महायुतीला मिळालेल्या मताचा अनादर होऊ नये असे मी सांगत आलोय, म्हणून पहिल्या फेरीच्या बोलणी करायला मी स्वतः भाजप कार्यालयात जाणार आहे. मुंबई महापालिका एवढ एक टार्गेट उद्धव ठाकरे सेना आणि मनसेचा आहे. याचा फायदा महायुतीला होणार आहे. सर्वांचे लक्ष युती कशी होईल याकडे लागले. सगळ्या गोष्टीचा विचार करून तिन्ही नेते ठरवतील.आमच्या सोबत बैठकीत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले संभ्रम वाद नको, निवडणुका युतीतच होणार आहे, असे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

  • 16 Dec 2025 12:20 PM (IST)

    माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू त्रिबंक पवार यांना अटक‌

    बीडच्या गेवराई मध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रिये दरम्यान मोठा राडा झाला होता. याच दरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई कार्यालयावर जाऊन आठ ते दहा जणांनी स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. यानंतर आता गेवराई पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली असून रात्री माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू त्रिंबक उर्फ बाळराजे पवार यांना देखील हल्ला प्रकरणात अटक केली आहे

  • 16 Dec 2025 12:10 PM (IST)

    नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

    उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन स्वतःला मराठी माणसाचे कैवारी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.. संजय राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा होणे आनंदाची बाब, मात्र राजकीय मैदान आता भाजप–महायुतीने काबीज केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकांची धुमाळी सुरू असून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच भगवा फडकेल, याबाबत शंका नाही. मुंबईकरांनी २५ वर्षांचा उबाठा कारभार आणि साडेतीन वर्षांचा देवेंद्र फडणवीस–एकनाथ शिंदे यांचा विकासकामांचा अनुभव घेतलेला आहे. मेट्रो, रस्ते, पायाभूत सुविधा यांसारखे प्रकल्प फक्त भाजप–महायुतीच करू शकते, असा जनतेचा विश्वास आहे. संजय राऊत कितीही पत्रकार परिषदा घेतल्या तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही असा दावा माध्यम प्रमुख नवनात बन यांनी केला आहे.

  • 16 Dec 2025 12:00 PM (IST)

    रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या….अकोलेकर रस्त्यावर

    अकोलेकरांचे रेल्वे मार्गासाठी आंदोलन करण्यात येत आहे.अकोले तालुक्यातील हजारो नागरीकांचा आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.अकोले शहरातुन बाईक रॅलीने आंदोलक संगमनेर प्रांतकार्यालयाकडे रवाना झाले आहेत. अकोले ते संगमनेर 22 किलोमीटर बाईक रॅली काढण्यात येत आहे. नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले – संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या मोर्चात आमदार डॉ.किरण लहामटे,आमदार सत्यजित तांबे , खासदार भाऊसाहेब वाकचौरे , डॉ.अजीत नवले आदी राजकीय नेत्यांसह यासह सर्व पक्षातील पदाधिकारी सहभागी होणार.

  • 16 Dec 2025 11:47 AM (IST)

    मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण – शितल तेजवानीचा आज बावधन पोलीस घेणार ताबा

    मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शितल तेजवानीचा बावधान पोलीस आज ताबा घेणार आहेत. येरवडा कारागृह येथे बावधन पोलीस दाखल झाले असून ते कागदपत्रांची पूर्तता करून थोड्या वेळात शितल तेजवानी हिला ताब्यात घेतील.

  • 16 Dec 2025 11:31 AM (IST)

    संजय राऊत पोहोचले राज ठाकरे यांच्या भेटीला

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत आणि अनिल परब हे ‘शिवतीर्थ’ येथे दाखल झालेत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसाठी तारीख ठरण्याची शक्यता आहे.

  • 16 Dec 2025 11:24 AM (IST)

    खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलाने जन्मदात्या बापालाच केली मारहाण

    बीडच्या आष्टी तालुक्यातील हाजीपुर गावात भयाक घटना घडली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने एका तरूणाने त्याच्या वडिलांनाच प्लास्टिक पाईप, लाकडी काठीने तसेच दगडाने अमानुष मारहाण केली. या प्रकरणी आरोपी संतोष मोहन साप्ते याच्या विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

  • 16 Dec 2025 11:10 AM (IST)

    मुंबईत महायुतीचा भगवा फडकेल – नवनाथ बन

    मुंबई पालिकेतील 25 वर्षांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे,  मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल – नवनाथ बन

  • 16 Dec 2025 10:58 AM (IST)

    नांदेड – नायब तहसीलदाराला मारहाण करणारा तलाठी अखेरिलंबित

    वाळू माफियावर कारवाई केल्याने तलाठ्याने नायब तहसीलदाराला मारहाण केली होती. तलाठी प्रदीप पाटील यांनी नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे करून शिवीगाळ करून मारहाण केली होती. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तलाठी प्रदीप पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

  • 16 Dec 2025 10:46 AM (IST)

    दाऊद इब्राहिमचा निकटवर्ती कुख्यात गँगस्टर सुभाष सिंह ठाकूर पोलिसांच्या ताब्यात

    मीरा-भायंदर-वसई-विरार (MBVV) पोलिसांच्या क्राइम ब्रांचने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्ती कुख्यात गँगस्टर सुभाष सिंह ठाकूर याला उत्तर प्रदेशातील फतेहगढ सेंट्रल जेलमधून प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले आहे. 26 फेब्रुवारी 2022 रोजी विरारच्या मनवेलपाडा भागात दिनदहाडे गोळ्या झाडून हत्या झालेल्या बिल्डर चव्हाण प्रकरणात ठाकूर मुख्य आरोपी असून, तुरुंगातूनच त्याने हत्येची योजना आखल्याचा आणि सुपारी दिल्याचा आरोप आहे.

  • 16 Dec 2025 10:45 AM (IST)

    आज एकनाथ शिंदे घेणार ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक

    गटप्रमुख, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार, खासदार, माजी नगरसेवक सर्वांना आज एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. कालच मुंबईसह ठाण्याची निवडणूक जाहीर झाली, त्यामुळे आज पासूनच एकनाथ शिंदे एक्शन मोडवर आहेत. ठाण्यात युतीकरून भाजप सोबत लढायचे असल्याने, जागा वाटप, प्रचार, मोठ्या सभा, इच्छुक उमेदवार यासंदर्भात आज महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज संध्याकाळी टिप टॉप प्लाज़ा इथे बोलावण्यात बैठक आली आहे.

  • 16 Dec 2025 10:30 AM (IST)

    आमदार अण्णा बनसोडे अजित पवारांना भेटण्यासाठी दाखल…

    उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासून पिंपरी चिंचवड मधील इच्छुकांच्या भेटी आणि मुलाखती घेत आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे देखील बारामती होस्टेल या ठिकाणी आले आहेत.

  • 16 Dec 2025 10:13 AM (IST)

    काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं दिसत नाही – संजय राऊत

    काँग्रेस या क्षणी सोबत आहेत असं वाटत नाही… बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे… असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे… येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे… आज राज ठाकरे यांची भेट घेणार… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 16 Dec 2025 09:50 AM (IST)

    डोंबिवलीमधील धक्कादायक घटना, जुन्या वादातून हत्या

    डोंबिवली मधील धक्कादायक घटना. जुन्या वादाच्या रागातून चाकू-लोखंडी रॉडने 40 हून अधिक वार करत तरुणाची निर्घृण हत्या. डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सीसीटीव्ही व तांत्रिक पुराव्याच्या आधारे अवघ्या १२ तासांत पोलिसांनी तीन आरोपीला ठोकल्या बेड्या

  • 16 Dec 2025 09:40 AM (IST)

    अजित पवारांनी लावली फिल्डिंग, थेट उतरले मैदानात…

    पिंपरी – चिंचवडमधील भारतीय जनता पार्टीचे अनेक माजी नगरसेवक आज करणार अजित पावराच्या पक्षात प्रवेश. भारतीय जनता पार्टीच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे अजित पावराच्या भेटीसाठी आल्या. अजित पावराच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश….

  • 16 Dec 2025 09:30 AM (IST)

    महावितरणने शेतीपंपासाठी नवीन कनेक्शन बंद केल्याने शेतकरी मेटाकुटीला

    राज्य सरकारने शेतीपंपासाठी महावितरणची नवीन वीज कनेक्शन बंद करून सौर पंपाची सक्ती केली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वीजही नाही आणि सौर पंप ही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन सुगीच्या दिवसात महावितरण आणि सोलार कंपन्यांकडून शेतकऱ्याची पिळवणूक सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शेती पिकाला पाणी देण्याच्या दिवसात अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवल्याने शेतातील उभी पिके सुकू लागली आहेत.

  • 16 Dec 2025 09:20 AM (IST)

    आज अकोलेत कडकडीत बंद, रेल्वे मार्गासाठी एल्गार

    आज अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांचा संगमनेर प्रांतकार्यालयावर मोर्चा. नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले – संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा. शिर्डी – शहापुर रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण व्हावे या दोन मुख्य मागण्या मागण्यासाठी आज अकोले बंदची हाक…

  • 16 Dec 2025 09:10 AM (IST)

    सोलापुरात 50 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदाराला रंगेहात अटक

    उत्तर तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या चंद्रकांत हेडगिरे या नायब तहसीलदारावर पुणे अँटी करप्शन विभागाची कारवाई. मंडल अधिकाऱ्याचे थकलेले वेतन काढण्यासाठी मागितली होती 60 हजार रुपयांची लाच. पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने सोलापुरात नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ. सदर घटनेबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

  • 16 Dec 2025 08:56 AM (IST)

    आज अकोलेत कडकडीत बंद

    आज अकोलेत कडकडीत बंद आहे. अकोलेकरांनी रेल्वे मार्गासाठी एल्गार पुकारला आहे. आज अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांचा संगमनेर प्रांतकार्यालयावर मोर्चा आहे. नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले – संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा,
    शिर्डी – शहापुर रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण व्हावे या दोन मुख्य मागण्यांसाठी बंद पुकारला आहे.

  • 16 Dec 2025 08:46 AM (IST)

    नाशिकच्या मखमलाबाद परिसरात आज देखील वृक्ष लागवड

    नाशिकच्या मखमलाबाद परिसरात आजदेखील वृक्ष लागवड होत आहे. काल 1000 झाडांचं वृक्षारोपण झालं होतं. टप्पाटप्प्याने शहरात 15000 झाडं लावली जाणार आहेत. शहरात देशी झाडांची लागवड होणार आहे. काल गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीला सुरुवात झाली होती. आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीवरून देशी झाडं नाशिकमध्ये दाखल होत आहेत.

  • 16 Dec 2025 08:39 AM (IST)

    नागपूर- दीक्षाभूमी सौंदर्यीकरण, पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाच्या कालमर्यादेबाबत शपथपत्र दाखल

    नागपूर- दीक्षाभूमी सौंदर्यीकरण आणि पुनर्विकास प्रकल्पाच्या विलंबावर नागपूर खंडपीठाने फटकारल्यानंतर कामाच्या कालमर्यादेबाबत शपथपत्र दाखल करण्यात आलं. सुधारित डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी पाच आठवड्यात सादर करणार असल्याचं शपथपत्र आहे. एनएमआरडीए (NMRDA) ही प्रकल्पाची नोडल एजन्सी आहे. तर समाजकल्याण आणि न्याय विभागाच्या सूचनेनुसार डिझाईनमध्ये बदल सुरू झाले आहेत.

     

  • 16 Dec 2025 08:36 AM (IST)

    अब्दुल सत्तार यांची घोड्यावर बसून मिरवणूक

    छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील तलवाडा गावात विकास कामांचं लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होतं. यावेळी गावाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला म्हणून गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांची घोड्यावर बसून गावात मिरवणूक काढत अनोखं स्वागत केलं.

  • 16 Dec 2025 08:34 AM (IST)

    सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस होणार मुलाखती.

    सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस मुलाखती होणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडे 1200 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आजपासून तीन दिवस भाजप कार्यालयात मुलाखती होणार असल्याची शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांनी माहिती दिली.

  • 16 Dec 2025 08:32 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये दाखल

    उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. महापालिका निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी आले आहेत.