
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार आज रविवार 30 नोव्हेंबर 2025 रोजी शिगेला पोहोचला आहे. कारण आज प्रचाराचा सुपर संडे आहे. निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार सोमवारी रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार आहे.या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते आज ठिकठिकाणी सभा, रॅली आणि बैठका घेणार आहेत. सर्व प्रमुख पक्षांचे व उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती साठी मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने स्वच्छ, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस महासंचालकांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत निर्देश दिले आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
शिर्डीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कंडक्टरची पती – पत्नीला मारहाण
शिर्डी शहरातील आरबीएल चौकात सायंकाळच्या सुमारास घडली घटना
एसटी बसच्या कंडक्टरचा पती-पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर
दुचाकी बंद पडल्याने ती रस्त्यावरून बाजूला घेण्यावरून एसटी कंडक्टर आणि दुचाकीस्वारामध्ये झाला वाद
वादातून कंडक्टरने केली मारहाण, कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल
वाशिम नगर परिषदेची आणि रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि प्रभाग 10 अ या नगर सेवकपदांच्या जागांसंदर्भात न्यायालयात आक्षेप दाखल झाले होते. त्याचा निकाल 23 नोव्हेंबर नंतर लागल्यानं वाशिम नगर परिषदेसह रिसोड नगर परिषेदेच्या नगर सेवकांच्या दोन जागांसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नवीन आदेशात नमूद केल्यानुसार वाशिम नगर परिषदेची पूर्ण निवडणूक तर रिसोड नगर परिषदेच्या 2 नगर सेवकपदांसाठी आता 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
परळीमध्ये शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. परळीतील व्यापारी राहुल टाक व इतरांच्या वादातून टाक यांनी अवैध शस्त्रातून गोळीबार केला आहे. टाक यांनी आपल्या राहत्या घरी सात राऊंड फायर केल्याची माहिती परळी शहर पोलिसांनी दिली आहे. टाक यांच्या घरामधून पोलिसांनी फायर करण्यात आलेल्या गोळ्यांचे शेल जप्त केले आहेत, या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात टाक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक होणार की नाही, संभ्रम कायम
निवडणुकीचा चेंडू पुन्हा आयोगाच्या कोर्टात
अहवालावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?
निवडणूक आयोगाच्या निर्यणाकडे सर्वांचं लक्ष
निवडणूक आयोगाने निवडणुकीचा दिलेला कार्यक्रमच शंकास्पद असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही निवडणूक आयोग असा कसा वागू शकतो. तुम्ही अचानक निवडणुका पुढे ढकलणार याचा परिणाम जनतेवर काय होतो? याची जबाबदारी कोण घेणार असाही सवाल थोरात यांनी केला आहे.
जळगावातील जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना महाजन बिनविरोध विजयी असून यावर ज्योत्स्ना विसपुते यांनी त्यांच्या विजयावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मीरारोड येथे प्रभाग समिती क्र. 4 मध्ये मतदान यादीतील तफावत दूर करण्याचे आयुक्तांचे स्पष्ट आदेश असूनही अधिकारी अनुपस्थित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार मुजफ्फर हुसेन यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.आयुक्त राधाबीनोद शर्मा यांनी शनिवार–रविवारीही काम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही कार्यालयात एकही अधिकारी हजर नव्हता.
पुण्यातील कल्याणीनगर भागात भीषण अपघात झाला आहे. एका नामांकित रेस्टॉरंट व्हॅले पार्किंग काऊंटरवर कारने टक्कर मारल्याने सत्येंद्र मंडळ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कारचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता असे म्हटले जात आहे.
नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णालयात मारहाण करण्यात आली आहे. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास देत असल्याच्या आरोपावरून ही मारहाण करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून ही मारहाण केली आहे.
पुण्यातील संगमवाडी येथे एका तरुणाने आपल्याच मैत्रीणीची हत्या करत पिंपरीमध्ये जाऊन आत्महत्या केली आहे. हे दोघेही तरुण-तरुणी पुण्यातील ससून रुग्णालयात कामाला होते. प्रेम संबंधातून तरुणाने मैत्रिणीची हत्या केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. तरुणी ही मूळची पुण्याची असून तरुण हा बीडचा आहे. या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता म्हणून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचललं असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
नांदेडमध्ये मुलगा होण्यासाठी सासरचा दबाव, त्रास, मारहाणीला कंटाळून गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे. या महिलेला पहिली दीड वर्षाची मुलगी आहे. मात्र मुलगा झाला नाही म्हणून तिला झालेल्या मारहाणीत तिचा गर्भपात झाला. या त्रासाला कंटाळून गर्भवतीने जीवन संपवले आहे. आता पतीसह तीन नणंदांवर नांदेडच्या विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील प्रसिद्ध असलेल्या कोरेगाव पार्क मधील पंचतारांकित हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हॉटेल रिकामे करा, बॉम्ब ठेवला आहे असा फोन हॉटेलच्या लँडलाईनवर आल्याने एकच धावपळ उडाली. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तात्काळ हॉटेलची तपासणी केल्यावर हा ‘फेक कॉल’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव : मुक्ताईनगर येथे प्रचार सभेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. राजकारणाशी देणघेणं नसताना परिस्थितीमुळे मला राजकारणात यावं लागलं रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या. स्वर्गीय निखिल खडसे हे निघून गेल्याने मला आपल्यासमोर यावं लागलं आणि जनतेनेही मला आशीर्वाद दिले, असेही त्या म्हणाल्या
राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा पवार साहेबांची या वयात साथ सोडायची नाही हा विचार करून आम्ही साथ दिली. कार्यकर्त्यांना न्याय द्यायची वेळ जेव्हा आलेली आहे त्या काळात महाविकास आघाडी म्हणून लढू, शहरातील एकदुसऱ्या लोकांमुळे अशी चर्चा सुरु झाली आहे असे प्रशांत जगताप म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याचे, वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बिजीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ठाणे महानगर पालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आलेले नाहीत. तसेच, ठाणे महानगर पालिकेकडून एकही दवाखाना चालविला जात नसून निर्बिजीकरणही गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शिवाय, निर्बिजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचलले श्वान गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अखिल भारत हिंदू महासभेच्यावतीने तपोवन येथे वृक्षतोडीच्या विरोधात निषेध केला आहे. हा निषेध व्यक्त करत झाडांची पूजा करण्यात येत आहे. कळस मांडत पूजा करून वृक्षतोडीचा निषेध केला आहे.
इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे. आत्पकालीन परिस्थितीत शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून विरोध करण्यात येत आहे.
‘उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखासाठी शिंदेंचे लोक प्रचार करतायत. ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करावासा का वाटतोय? मग शिंदेंच्या उठावाला अर्थ होता का?’ असे सवाल नितेश राणेंनी उपस्थित केले आहेत.
लोकशाहीत टाटा, बिर्ला, अंबानींनाही एकच मत देता येतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अक्कलकोटमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान.
अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक पुढे ढकलण्यात आली. निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबत स्पष्ट केलं. तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक ५ ब आणि प्रभाग १५ ब, प्रभाग क्रमांक १७ अ, प्रभाग क्रमांक १० ब, प्रभाग क्रमांक ८ अ, प्रभाग १९ अ या प्रभागात नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्यावी लागणार आहे.
ही निवडणूक आम्ही जनतेसाठी लढवतोय. कोणी काय बोलतंय त्यासाठी आम्हाला 2 तारखेनंतर वेळ द्या, आम्ही त्याची उत्तरं देऊ. आम्हाला आमच्या जनतेची बाजू मांडू द्या. आम्हाला इकडच्या मतदाराला केंद्रबिंदू ठेऊ द्या, असं नितेश राणे म्हणाले.
सोलापूर- या निवडणुकीत अक्कलकोटमधील 3 शहरात भाजपची सत्ता आणल्यावर काहीही कमी पडू देणार नाही. दुधनीमध्ये मागीलवेळी नगराध्यक्ष भाजपचा होता आणि बॉडी विरोधकांची होती त्यामुळे विकासाला अडथळा आला. आता दुधानीला पूर्ण बहुमत द्या शहराचा विकास करतो, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं.
अमरावतीच्या रेवसा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाच्या आमसभेत वाद झाला. ग्रामसेवकाची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामसेवकाच्या गाडीने पुढे ढकलत नेलं. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. रजिस्टरमध्ये माहिती भरण्यावरून ग्रामसेवक आणि सदस्यांमध्ये वाद झाला.
सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अक्कलकोट दौऱ्यावर आहेत. अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. अक्कलकोटमध्ये भाजप उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर- पैठण नग परिषद निवडणूक पुढे ढकलली नसली तरी, प्रभाग क्रमांक 3 मधील ‘अ’, प्रभाग क्रमांक 6 मधील ‘अ’ ‘ब’ आणि प्रभाग क्रमांक 11 ‘ब’.. या जागेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उर्वरित सर्व जागेसाठी निवडणूक होतील. या संदर्भात पुढील सुनावणी सोमवारी 4 वाजता होणार असल्याची माहिती आहे.
दिग्रस पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची ही निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तेथे निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नव्याने कार्यक्रम दिला असून आता निवडणुक 20 डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
गोंदिया नगर परिषद येथील निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून दोन तारखेला मतदान होणार आहे मात्र त्याच्या दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने या वार्डातील काही जागांचा योग्य तारखेला न्यायालयिन निर्णय न आल्याने वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16 यामधील एका एका जागेचा निवडणूक स्थगिती करण्यासाठी निवडणूक आयोगाचे पत्र आज सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना धडकले त्यामुळे गोंदिया शहरातील वार्ड क्रमांक 3 मधील सर्वसाधारण ब वॉर्ड क्रमांक 11 मधील सर्वसाधारण ब आणि वार्ड क्रमांक 16 मधील सर्व साधारण ब या गटातील निवडणूक पुढे ढकलण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. तीन वार्डातील नगरसेवक उमेदवारांची हिरमोड झाल्याचे पहावयास दिसून आला.
गौरी पालवे हिचा मृत्यू संशयास्पद असल्याचे तिच्या कुटुंबाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी किंवा सीआयडी मार्फत सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी. मोठ्या नेत्याचा पीए आहे म्हणून काहीच होणार नाही ही मानसिकता धोकादायक आहे. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची तात्काळ दखल घ्यावी, पतीच्या मोबाईलचे सर्व डिटेल्स तपासावेत, आणि चौकशी कोणत्याही राजकीय दबावापासून मुक्त ठेवावी गृहमंत्री आणि महिला आयोगाने नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांना वाचवण्याची भूमिका घेऊ नये. गौरी पालवे सुद्धा कुणाची तरी लेक आहे, याची जाणीव सरकारने आणि यंत्रणांनी ठेवावी. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे दिपक केदार यांनी केली आहे.
महानगरपालिकेकडून मिस्ट कॅनन द्वारे मुंबईमध्ये ठीक ठिकाणी फवारणीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील बांद्रा मातोश्री परिसरामध्ये मिस्ट कॅननच्या माध्यमातून हवेतील धूळीकणांवर फवारणी सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असलेली धूळ जमिनीवरच दाबण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई काँग्रेस मुंबईतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकासाठी आक्रमक भूमिका घेत असताना महानगरपालिकेकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची आणि आता या निवडणुकीची प्रक्रिया 4 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची प्राथमिक माहिती दिली. दुपारपर्यंत जिल्हाधिकारी याबाबत अधिकची माहिती देणार आहे.
चोराच्या घरात चोरी पकडून दिली आहे. पण त्या आरोपीला साधी नोटीस पण दिली नाही. पण माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बेकायदेशीरपणे माझ्यावर एफआयआर नोंदवण्यात आला. कलमं पण अगदी विचित्र लावण्यात आलेली आहेत. पोलिसांनी मला अटक करावी असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपिल असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपिल असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
नदी महोत्सवासाठी पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची उपस्थिती… नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या रिव्हर वीक निमित्त महापालिकेच्या घनकचरा व पर्यावरण विभागातर्फे नदी महोत्सव २०२५ स्वच्छ नदी, सुंदर पुणे हा उपक्रम आयोजन… मुठा नदीपात्रातील स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी भिडे पूल ते म्हात्रे पूल यादरम्यान ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे… नदी स्वच्छता मोहीम, पथनाट्य, ड्रम सर्कल्स आदी कार्यक्रमांसह पर्यावरणविषयक जनजागृती स्टॉल्स नदी पाञात लावण्यात आले आहेत…
नवले पुल परिसरात महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघाता विरोधात नागरिकांचा मूक मोर्चा… नऱ्हे, धायरी, वडगाव व आसपासच्या परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न गंभीर होतोय लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात या मागणीसाठीच मोर्चा…
शहरातील मोरगे वस्ती परिसरात 4 बिबटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद… दाट लोकवस्ती परिसरात बिबट्याचा वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण… श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती येथील पाण्याच्या टाकी जवळील घटना… 29 नोव्हेंबरच्या मध्य रात्री 4 बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद… जिल्ह्यात सर्वत्र बिबट्यांमुळे दहशतीचे वातावरण… दिवसाही शेतात काम करणे झाले जिकरीचे… बिबट्यांचा बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी….
तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात सर्व पक्ष एकत्र… ज्या वृक्षांवर फुल्या मारल्या त्याच वृक्षांवर विविध पक्षांकडून गमछा बांधत निषेध… राजकीय पक्ष ही आता वृक्ष वाचवण्यासाठी मैदानात… पर्यावरण प्रेमींनी झाडांना पोस्टर लावल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून गमछे… वृक्षतोडीचा मुद्दा आता राजकीय…
पुणे: महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या (महामेट्रो) बहुप्रतिक्षित स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गीकेच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या दीड वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाला गती मिळाली आहे. महामेट्रोने या मार्गाचे काम मिळालेल्या आदानी समूहाला काम सुरू करण्याबाबतचे अधिकृत पत्र दिले आहे. यामुळे दक्षिण पुण्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पुणे : यावर्षी रब्बी हंगामातील पिकविम्याकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३ लाख २६ हजार १६८ शेतकऱ्यांनी २ लाख ६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी तुलना केल्यास ही संख्या अत्यंत कमी आहे; कारण गेल्या वर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांनी रब्बी पिकविमा उतरवला होता. पिकविमा योजनेत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कृषी विभाग आणि विमा कंपन्यांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे.
कल्याण शहरात भगवा तलावात उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पथकांनी बोटीच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबवली आणि अखेर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
राज्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी सरकारी, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये ‘पोश’ कायद्याची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. याच अनुषंगाने, ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनी तत्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी या नियमाचे पालन न करणाऱ्या आस्थापना प्रमुखांना ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. केवळ दंडच नव्हे, तर पुनरावृत्ती झाल्यास दंड दुप्पट करणे किंवा आस्थापनेचा परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. तसेच, स्थापन केलेल्या समितीची माहिती केंद्र सरकारच्या ‘शी बॉक्स’ पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्यक असून, ज्या कार्यालयांमध्ये समितीचा फलक दिसणार नाही, त्यांची तक्रार १८१ या महिला हेल्पलाईनवर करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानांची मर्यादित उड्डाणे असताना देखील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संकेत पुणे विमानतळ आणि देशात 19 व्या स्थानी मजल मारले आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन देशातील टॉप 20 शहरांची यादी प्रसिद्ध केली यात पुणे विमानतळ हे देशात एकूण 19 व्या स्थानी आहे
छत्रपती संभाजीनगर नगरपालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी उद्या थांबणार असून, शेवटच्या दिवशी सर्वांचे लक्ष पैठणकडे लागले आहे. कारण, पैठण नगर परिषदेसाठी भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना थेट आमने-सामने उभे ठाकले आहेत. प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. शिंदे शिवसेनेकडून खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी पैठण नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असताना, मुख्यमंत्र्यांची सभा लावून भाजपने थेट त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे, युतीतील हे दोन प्रमुख नेते एकाच मतदारसंघात प्रतिस्पर्ध्यांविरोधात प्रचार करताना काय बोलणार आणि यातून पैठणच्या निकालावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ दिसून येत होती. परिणामी शहरातून थंडी जवळजवळ नाहीशी झाली होती. तथापि, हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. या अंदाजामुळे शहर आणि परिसरात थंडीचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा थंडीच्या तयारीला लागावे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे हल्ले वाढल्याने दायक वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या चार तालुक्यातील 233 गावे ही बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. त्या गावातील शाळा पूर्वीच्या वेळे ऐवजी सकाळी साडेनऊ ते दुपारी चार या वेळेत भरवा अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना केली आहे.
१ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या संख्येने अनुयायी पुण्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, अनुयायांना अधिकाधिक सुरक्षित आणि चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण काळात सोशल मीडियावर पोलिसांचे बारकाईने लक्ष असणार आहे. कोणत्याही अफवा किंवा कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या पोस्टवर तातडीने कारवाई करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक सज्ज असणार आहे, जेणेकरून लाखो अनुयायांचे अभिवादन सुरक्षित वातावरणात पार पडेल.