फूटपाथावर आढळली 2 दिवसांची चिमुकली; तिच्या जवळची चिठ्ठी ज्याने वाचली तो प्रत्येकजण रडला, पनवेलमधील धक्कादायक प्रकार
नवी मुंबईतील पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल परिसरात असलेल्या एका आश्रमाच्या बाहेर फूटपाथावर एक नवजात मुलगी एका बास्केटमध्ये आढळून आली आहे.

नवी मुंबईतील पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल परिसरात असलेल्या एका आश्रमाच्या बाहेर फूटपाथावर एक नवजात मुलगी एका बास्केटमध्ये आढळून आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनं या मुलीला एका बास्केटमध्ये घालून आश्रमाच्या समोर असलेल्या फूटपाथावर ठेवलं. या मुलीसोबत एक दुधाची बाटली आणि काही कपडे देखील ठेवण्यात आले होते. दरम्यान मुलीला ज्या बास्केटमध्ये ठेवलं त्या बास्केटमध्ये एका चिठ्ठी देखील सापडली आहे. ज्यांनी कोणी ती चिठ्ठी वाचली त्या प्रत्येकाला अश्रू अनावर झाले. या चिठ्ठीमधून या चिमुकलीच्या आई-वडिलांवर ओढावलेल्या कठीण परिस्थितीचा अंदाज येतो.
चिठ्ठीमध्ये नेमकं काय म्हटलं?
पनवेल परिसरात असलेल्या एका आश्रमासमोरील फूटपाथावर बास्केटमध्ये ठेवलेली एक नवजात चिमुकली आढळून आली आहे. तिच्या बास्केटमध्ये एक चिठ्ठी देखील होती. ही चिठ्ठी मुलीच्या आई वडिलांनी इंग्रजीमध्ये लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे की ‘ आमच्यावर ही वेळ आली आहे, याचं आम्हाला खूप दु:ख होत आहे. आमच्या जवळ आता दुसरा कोणताच मार्ग नाहीये, आम्ही मानसिकरित्या आणि आर्थिकरित्या आमच्या या मुलीचं पालन -पोषण करण्यास असमर्थ आहोत. कृपा करून या प्रकरणाला वेगळं वळण देऊ नका, आम्ही सध्या ज्या परिस्थितीमधून जात आहोत, ती परिस्थिती आमच्या मुलीवरही यावी असं आम्हाला वाटत नाही. आम्ही विनंती करतो की आमच्या मुलीचा जीव वाचवा. आम्हाला असा विश्वास वाटतो की, एक दिवस आम्ही आमच्या मुलीला नक्की आमच्या घरी घेऊन जाऊ, आम्ही तिच्या जवळच आहोत, आम्हाला माफ करा.’
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून त्यांनी त्या दिशेला धाव घेतली. त्यांना आश्रमासमोरील फूटपाथावर एक बास्केट दिसलं. त्यांनी ते बास्केट उघडून पाहाताच त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण त्या बास्केटमध्ये एक चिमुकली होती. तिच्यासोबत एक दुधाची बाटली आणि काही कपडे देखील होते. सोबतच तिथे एक चिठ्ठी देखील सापडली आहे. दरम्यान पोलिसांनी या मुलीला आपल्या ताब्यात घेतलं असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
