अवघ्या 2 विद्यार्थ्यांची शाळा ! शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून खटाटोप, कुठे आहे हे अनोखं विद्यालय ?

नागपूर जिल्ह्यातील हत्तीबोडी गावात फक्त दोन विद्यार्थ्यांसाठी एक मराठी शाळा चालवण्यात येते. शाळा बंद होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. शिक्षिका दररोज ९० किमी प्रवास करून येतात. हा निर्णय ग्रामीण भागात मराठी शिक्षणाच्या टिकावपणाचे प्रतीक आहे. या शाळेमुळे मराठी भाषेचे आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते.

अवघ्या 2 विद्यार्थ्यांची शाळा ! शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून खटाटोप, कुठे आहे हे अनोखं विद्यालय ?
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 2:40 PM

शाळा.. प्रत्येकाचं आयुष्य घडवणारी, स्वत:च्या पायावर उभ राहण्यास मदत करणारी आपली शाळा. शाळेबद्दल प्रत्येकालाच अनोखा ओलावा असतोच, आपली शाळा ही सर्वांनाच प्रिय असते. सध्या राज्यात मराठी आणि हिंदी विषयावरुन वादळ उठलेलं असतानाच, मराठी शाळांचं आयुष्य संपत आल्याची रड सुरू असताना, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती अवघ्या 2 विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेली एक अनोखी मराठी शाळा. नागपूर जिल्ह्यातील हत्तीबोडी गावातील मराठी शाळा कायमची बंद होऊ नये म्हणून सरकारने अवघ्या दोन विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरु ठेवलीय. हत्तीबोडी या गावात, आर्यन आणि श्लोक या दोन विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्च करुन ही शाळा सुरु आहे. या अनोख्या शाळेबद्दल जाणून घेऊया.

फक्त 2 विद्यार्थ्यांसाठी सुरू असते शाळा

नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील हत्तीबोडी या गावात चक्क 2 विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळा सुरू आहे. हत्तीबोडी गावातील मराठी शाळा कायमची बंद होऊ नये म्हणून श्लोक चौधरी आणि आर्यन धुर्वे हे दोन विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणून अवघ्या 2 विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरु ठेवण्यात आलीय. लाखो रुपये खर्च करून ही शाळा सुरू असून गावातील मराठी शाळा कायमची बंद होऊ नये म्हणून इथे सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. या अनोख्या शाळेची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

नागपूर – चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवर हत्तीबोडी हे छोटंसं गावं आहे. गावात 35 ते 40 घरं आहेत, गावातील काही विद्यार्थी शहरात शिकायला गेले आहेत. पण जी मुलं शहरात जाऊ शकत नाही, अशी दोन मुलं या गावातल्या शाळेत शिकतात. ही शाळा बंद होऊ नये, हीच इथल्या पालकांची आशा आहे. गावातील मराठी शाळा कायम बंद होऊ नये म्हणून सर्वांचेच प्रयत्न सुरु आहे. कारण एकदा हत्तीबोडी गावातील शाळेला कुलूप लागलं तर पुन्हा शाळा सुरु होणार नाही. आणि विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळेत जावं लागू शकतं. त्यासाठी सर्वजण मेहनत घेऊन, शिक्षिका तर रोजचा कित्येक किलोमीटरचा प्रवास करून या शाळेत येतात आणि त्यांच्या दोन विद्यार्थांना शिक्षण देतात.

90 किमी प्रवास करून येतात शिक्षिका

श्लोक आणि आर्यन हे दोन विद्यार्थी पाचव्या वर्गात शिकतात. ही शाळा फक्त दोन विद्यार्थ्यांसाठीच भरते, इथे या दोघांसाठीच रोज मध्यान्न भोजन तयार होतं, अवघ्या दोन विद्यार्थ्यांचे खेळ होतात आणि दोघांसाठीच सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडतात. एवढंच नव्हे तर फक्त या दोन विद्यार्थ्यांना शिकता यावं, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षिका वैशाली आयलवार या दररोज 90 किमीचा प्रवास करुन रोज या शाळेत येतात. आणि त्या नियमितपणे श्लोक आणि आर्यनचे वर्ग घेतात.