अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आधी 1 लाख तरी द्या…; उद्धव ठाकरेंनी सरकारला खडसावले

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या मराठवाडा व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने ₹१ लाख जमा करण्याची आणि संपूर्ण कर्जमुक्तीची त्यांनी मागणी केली आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आधी 1 लाख तरी द्या...; उद्धव ठाकरेंनी सरकारला खडसावले
uddhav thackeray
| Updated on: Oct 17, 2025 | 2:11 PM

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान झाले आहे. या आणि कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी त्यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने १ लाख रुपये जमा करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना मला मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकरी आठवतो आहे. त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे इतर कोणी येवो न येवो, त्यांच्यासोबत कोणी राहो न राहो पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी यापूर्वीही दिलेला आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या सरकारला आपण सोडायचं नाही

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवाफसवी करत असल्याचा गंभीर आरोप केला. सरकारची फसवा फसवी सुरू आहे. मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण सोडायचं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घोषणेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या मदतीची मागणी केली. सरकारने जे साडेतीन लाख जाहीर केलेत, त्यातले पैसे शेतकऱ्यांना नंतर द्या, पण यातले एक लाख रुपये दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाका. त्यांचे कर्ज पूर्ण माफ करा ही आपली मागणी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

नाहीतर नुसत्या घोषणा देऊन काय उपयोग

यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. मी मुंबईत असलो तरी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क सुरु असतो. मी दिवाळीनंतर येणार असलो, तरी तालुका पातळीवर सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही हे पाहायला हवं. तसेच ती मदत मिळवून देण्याचे काम आपल्या शिवसैनिकांनी करायचं आहे. नाहीतर नुसत्या घोषणा देऊन काय उपयोग, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करताना ठाकरे यांनी या सरकारला घालवायचा आहे असा निर्धार व्यक्त केला. मराठवाडा आणि महाराष्ट्राने या सरकारचा अनुभव घेतला आहे, असेही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ :