जरांगेंची अंतरवलीत फुल्ल तयारी, ठाकरेंना शिवाजी पार्कची प्रतीक्षा; दोन दसरा मेळाव्यांकडे राज्याचं लक्ष

राज्यात या वर्षी मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होणार आहे. ते तयारी लागले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मात्र शिवाजी पार्क मैदानाची परवानगी अद्याप मिळालेली नाही.

जरांगेंची अंतरवलीत फुल्ल तयारी, ठाकरेंना शिवाजी पार्कची प्रतीक्षा; दोन दसरा मेळाव्यांकडे राज्याचं लक्ष
uddhav thackeray and manoj jarange patil
| Updated on: Sep 08, 2025 | 6:51 PM

Manoj Jarange Patil And Uddhav Thackeray : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. जमेल त्या मार्गाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. येणाऱ्या दसऱ्याला तर अनेक राजकीय पक्ष आपली ताकद दाखवून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी नुकतेच उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांचादेखईल यावेळी मोठा दसरा मेळावा होणार आहे. तर दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे उद्धव ठाकरे हेदेखील आपल्या दसरा मेळाव्याची तयारी करत आहेत. या दोन्ही दसरा मेळाव्यांत राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगेंची मोठी घोषणा

मनोज जरांगे यांच्या उपोषनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाच्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीची प्रक्रिया सोपी केली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज आरक्षणात जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे करत आहेत. लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील मराठादेखील आरक्षणात जाईल, असेही ते सांगत आहेत. 8 सप्टेंबर रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आपल्या याच भूमिकेचा पुनरूच्चार केला. तसेच गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षीदेखील आपला दसरा मेळावा होईल, असे जरांगे यांनी जाहीर केले. त्यांनी या दसरा मेळाव्यासाठी तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता जरांगे या दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंना मैदानाच्या परवानगीची प्रतीक्षा

दरवर्षी उद्धव ठाकरे यांचा मुंबईतीली शिवाजी पार्कवर मोठा दसरा मेळावा होतो. या दसरा मेळाव्याला राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. गेल्या वर्षी ठाकरे यांचा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला होता. या वर्षीदेखील शिरस्त्याप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जानेवारी 2025 मध्येच दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासाठी परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळालेली नाही. 2 ऑक्टोबर रोजी दसरा असून दरवर्षी या दिवशी शिवसेनचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडतो. जानेवारी महिन्यात अर्ज केल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाकडून जवळपास तीन वेळा परवानगीबाबत स्मरणपत्र देखील पालिकेला देण्यात आलं आहे. मात्र यावर पालिकेकडून काहीच उत्तर आलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ठाकरेंना या मैदानाची परवानगी मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.