तुमच्या हातात लाठ्या असतील, बंदुका असतील पण…, उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट मोठा इशारा, शिवाजी पार्कमधून रणशिंग फुंकलं
नेट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले आहेत, दरम्यान या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील भेट दिली आहे.

नीट पेपरफुटीवरून सध्या देशात वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या एक महिन्यापासून जंतर -मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे आता देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईतील शिवारीज पार्क मैदानात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दरम्यान या आंदोलनाला आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील भेट दिली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आता थेट सरकारला मोठा इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. या चार दिवसांमध्ये आपण या जागेवर दुसऱ्यांना भेटलेलो आहोत. परवा मी दिल्लीला जाऊन आलो. रविवारी आपण पुन्हा भेटणार आहोत. या गर्दीचं एक वैशिष्ट आहे, अनेक जण सांगतात की इकडे आमच्या ओळखीचं कुणी नाहीये, आणि नेमकी हीच गोष्ट महत्त्वाची आहे, आपण सर्व भारतीय आहोत, हिंदूस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरायला भाग पाडून, आपल्याला भीती दाखवून आतापर्यंत आपल्यावर जे राज्य करत आहेत, त्यांनी हे दृष्य पहाण्यासारखं आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की मला त्यावेळी अनेकांनी विचारलं तुम्हाला काही बोलयाचं आहे का? तेव्हा मी म्हणालो मला काही बोलयाचं नाही, पण हा जनतेचा आवाज आहे, आणि हा आवाज दिल्लीवाल्यांना ऐकावाच लागेल. मी तमाम देशबांधवांना सांगतोय, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, ठीक आहे, मी आता सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदूका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातात हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदूका घेऊन या, मी तिरंगा घेऊन येतो. बघू तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही जिंकते, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.