
Uddhav Thackeray : नागपुरात हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कोंडीत पकडत आहेत. लाडकी बहीण, बिबट्यांचा उच्छाद, शेतकरी कर्जमाफी याबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत. याच हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील नागपुरात पोहोचले आहेत. विधिंमडळाच्या कामकाजात ते सहभागी होणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच विरोधी पक्षनेतेपदाच्या नेमणुकीवर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करून एका प्रकारे एकनाथ शिंदे यांनाच डिवचलं आहे. उपमुख्यमंत्री पदाला काही महत्त्व नाही, असं ठाकरे म्हणाले आहेत.
सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी या पदासाठी भास्कर जाधव यांच्या रुपात नाव सुचवलेलं आहे. परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हाच मुद्दा अधोरेखित करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गेल्या वर्षी मी म्हटलं होतं की विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा सांगितला होता. भास्कर जाधव यांचं नावही सूचवलं आहे. पण उत्तर आलं नाही,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच नियम असला काय नसला तरी दोन, दोन उपमुख्यमंत्रिपदं तयार केली जातात. मग विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरता का? असा सवालही ठाकरेंनी केला.
तुमचे सरकार मजबुत आहे. तुमचे 200 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहेत. तुमच्या सरकारला केंद्र सरकारचाही आशीर्वाद आहे. तरीही विरोधी पक्षनेतेपद का दिले जात नाही. तुम्ही एवढे कशाला घाबरता, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केले. विरोधी पक्षनेतेपद दिले जात नसेल तर मग असंवैधानिक असलेले उपमुख्यमंत्रिपदही काढून टाका. त्या त्या खात्याच्या नावाने मंत्री ओळखला गेला पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. भाजपाच्या नेत्यांनीच सांगितलं आहे की नंबर एकलाच महत्त्व असतं. नंबर दोनचं महत्त्व नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची ही टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीच आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याला आता एकनाथ शिंदे काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.