
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला एक सुपरफास्ट मुलाखत देत दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या, राज्यातील अनेक राजकीय घडामोडींवर परखड शब्दांत मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका तर केलीच पण ठाकरे ब्रँड पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या, शिवसेनेचे दोन भाग करत पक्ष आणि चिन्हावर दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंवरही जोरदार निशाणा साधला. जे अनिष्ट आहे, त्याविरोधात आम्ही बराच काळ संघर्ष करत आलो, त्यामुळेच लोकांनी ठाकरे हा ब्रँड स्वीकारला. काही बँड वाजत आहेत, पण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंही नाव नको आहेत. ज्यांच्याकडे काहीच नाही, जे पोकळ आहेत, त्यांना ब्रँडची गरज मदत लागते अशा शब्दांत उद्धव ठाकेरंनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली.
शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मोठी दूरी दिसून आली, वेळोवळी दोनही पक्षांनी, नेत्यांनी एकमेकांवर जहरी शब्दांत टीकाही केली. अवघ्या काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे हे कार्यक्रमासाठी विधानभवनात गेले होते, तेव्हा मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्यासह सर्वांनी त्यांना नमस्कार करत औपचारिकपण गप्पाही मारल्या, मात्र तेथेच एकनाथ शिंदे उपस्थित असूनही त्यांनी उद्धव ठाकरेंकडे बघणे, त्यांना नमस्कार करणे टाळले, किंबहुना त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. तर उद्धव ठाकरेही सर्वांशी हसून बोलले पण एकनाथ शिंदेंकडे त्यांनी पाहिलेही नाही. या दोघांमधील तणाव, दरी स्पष्ट दिसत होती. तर सामनाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर पुन्हा हल्ला चढवत त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.
ठाकरे नुसता ब्रँड नाही तर..
ठाकरे नुसता ब्रँड नाही. महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोणी प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि गेले, पुसू टाकणारे पुसले गेले.. किंवा जनतेने त्यांना पुसून टाकलं. आज माझ्याकडे काही नाही. तरीही प्रेमाने, आपुलकीने लोकं स्वागत करतात. जे घडतं त्याबद्दल संताप व्यक्त करतात. ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे, तो आम्ही बनवलेला नाही. ठाकरे प्रामाणिक आहेत. लोकांसाठी लढणारे, जनतेच्या व्यथा-वेदनांना निर्भीडपणे वाचा फोडणारे आहेत. म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्षे आमच्या सोबत राहिली असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे ब्रॅण्ड संपवण्यासाठी अनेक बॅण्ड
पण ठाकरे हा बॅण्ड संपवण्यासाठी दिल्लापासून ते महाराष्ट्रापर्यंत अनेक लोकं कार्यरत आहेत, त्याबद्दल संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी तेवढयाच रोखठोक शब्दांत उत्तर दिलं. ” काही बँड वाजत आहेत. आपल्याशिवाय देशात कोणतंही नाव नको आहेत. ते स्वत:ची तुलना देवाबरोबर करत आहेत. अशा लोकांबद्दल काय बोलायचं. काळाच्या ओघात येतात आणि काळाच्या ओघात जातात. आपल्या परंपरेला कोणी मानत नसेल तर ती परंपराही त्यांना मानत नाही. ” असं ते म्हणाले.
जे पोकळ आहेत, त्यांना ठाकरे ब्रँडची गरज, मदत लागते..
ज्यांच्याकडे काही नाही जे पोकळ आहेत. त्यांना ठाकरे ब्रँडची गरज लागत आहे. मदत लागत आहे. हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी काहीच निर्माण केलं नाही. त्यांनी कोणताही आदर्श निर्माण केला नाही. भले त्यांना १०० वर्ष झाले असतील त्यांना किंवा आणखी काही वर्ष झाली असतील. पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय. काहीच नाही. मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतचं महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे अशी टीका उद्धव यांनी भाजप आणि शिंदे यांच्यावर केली. पण लोकं त्यांना भूलणार नाहीत असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.