कधीही भडका उडेल, देश वाचवायचाय… उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना संदेश, दसरा मेळाव्याआधी आखली रणनीती!

Uddhav Thackeray Shivsena Dussehra Rally: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना कानमंत्र दिला आहे. महिला पदाधिकाऱ्यांना घराघरात पोहोचण्याची सूचना दिली आहे.

कधीही भडका उडेल, देश वाचवायचाय... उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना संदेश, दसरा मेळाव्याआधी आखली रणनीती!
| Updated on: Oct 09, 2026 | 10:25 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्याच्या देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. या बैठकीत देशातील वातावरण तापलेलं असून परिस्थिती कधीही चिघळू शकते, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच देश वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं असल्याचं आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.

बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या देशातील वातावरण तापलेलं आहे. परिस्थिती अशी आहे की कधीही भडका उडू शकतो. सध्या देशाचं नेतृत्व करणारे नेते कसे तयार झाले, हे आपण जवळून पाहिलं आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शिवसैनिक म्हणून सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. देश वाचवायचा असेल, तर एकजुटीने काम करावं लागेल, असा संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

Loading...

देशातील सध्याच्या परिस्थितीवर दसरा मेळाव्यात सविस्तर भाष्य करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले आहे. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणते मुद्दे मांडणार आणि सत्ताधाऱ्यांवर कोणत्या शब्दांत टीका करणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांनाही विशेष मार्गदर्शन केलं. आगामी काळात महिला वर्गाशी संपर्क वाढवण्यावर आणि त्यांच्याशी पक्षाची नाळ अधिक घट्ट करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आम्ही दरवाजापर्यंत पोहोचू शकतो. परंतु तुम्ही चुलीपर्यंत पोहोचू शकता, असं सांगत त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित केलं. महिला पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क वाढवावा, घराघरांत जाऊन पक्षाची भूमिका मांडावी, नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घ्याव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. एकीकडे दसरा मेळाव्याची तयारी, तर दुसरीकडे महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती, अशा दोन्ही पातळ्यांवर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us